दोन दिवसांत मिळणार ‘लोकसभे’च्या कामाचा भत्ता: पावणेदोन कोटींची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:48 PM2019-11-15T13:48:13+5:302019-11-15T13:50:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती असलेल्या ४१४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुमारे एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती असलेल्या ४१४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुमारे एक कोटी ६७ लाख ७० हजारांचा अतिकालिक भत्ता दोन दिवसांत मिळणार आहे. याची बिले गुरुवारी कोषागार कार्यालयात पाठविण्यात आली असून ती मंजूर होतील, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. ‘लोकमत’मधून १० नोव्हेंबरला ‘लोकसभे’च्या भत्त्यापासून तीन हजार जण वंचित’ असे वृत्त देऊन या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून तातडीने हालचाली झाल्या.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागासह जिल्हा परिषद, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आयकर विभाग, विक्रीकर विभाग, कृषी, आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाºयांचा अतिकालिक भत्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांमध्ये नाराजीची भावना होती. त्याबाबत वृत्तपत्रातून वृत्त आल्यानंतर निवडणूक विभागाने तातडीने निवडणूक निधीतून महागाई भत्त्यासाठी सुमारे एक कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांची बिले कोषागार कार्यालयात जमा केली आहेत. यामध्ये वर्ग-१चे अधिकारी ५९, वर्ग-२ चे अधिकारी ६८, वर्ग-३चे कर्मचारी २०७, वर्ग-४चे कर्मचारी ८० असे मिळून ४१४ जणांचा समावेश आहे. त्यांना मूळ वेतनाइतका भत्ता मिळणार आहे. हा भत्ता सरासरी जादा काम केलेल्यांबरोबरच कमी काम केलेल्यांनाही जवळपास सारखाच मिळणार असल्याचे दिसत आहे. ही रक्कम संबंधितांना दोन दिवसांत मिळणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. ही भत्त्याची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांसाठी आहे; परंतु अद्याप तालुकास्तरावर नियुक्ती असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना भत्ता मिळालेला नाही.
========================
कोट...
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांसाठी दोन दिवसांत भत्ता मिळणार आहे. याबाबतची बिले गुरुवारी कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. तसेच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाºयांचे भत्ते अद्याप देणे बाकी आहे. संबंधित अधिकाºयांना कर्मचाºयांची संख्या व किती निधी अपेक्षित आहे, याबाबत प्रस्ताव मागून आठवडा झाला; परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेले नाही.
- सतीश धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
====================================================
(प्रवीण देसाई)