अंबाबाई मंदिर नवरात्रौत्सव: पेड दर्शन ओके, पण व्हीआयपी नकोच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 02:29 PM2022-09-15T14:29:47+5:302022-09-15T14:30:35+5:30
अंबाबाईचा नवरात्रौत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या ज्या भाविकांना रांगेत थांबायचे नाही, त्यांच्यासाठी पेड ई पासची सोय करण्यात येणार आहे. या निर्णयाला काही जणांनी विरोध केला आहे. वास्तविक गर्दीचे व्यवस्थापन भाविकांच्या वेळेचे नियोजन यासाठी हे चांगले आहे. पण हे करताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने याकाळात व्हीआयपी दर्शनावर फुली मारण्याची गरज आहे. त्याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य भक्तांना आणि समितीला होतो.
अंबाबाईचा नवरात्रौत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. याकाळात २५ लाखांवर भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यातले २५ टक्के भाविक देवस्थान समितीच्या कार्यालयात येऊन येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्हीआयपी दर्शनासाठी गळ घालत असतात. नेत्यांकडून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेली माणसं असतात, फोन जोडून देतात. त्यामुळे समितीला नकार देणंही जमत नाही. त्यामुळे मंदिराची कामे राहिली बाजूला अन् अर्ध्याच्यावर कर्मचारी या तथाकथिक व्हीआयपींना दर्शनासाठी नेण्या-आणण्यातच व्यस्त असतात. हाच प्रकार दुसरीकडे पोलिसांकडूनदेखील केला जातो. कारण शनि मंदिराकडील गेटची किल्ली त्यांच्याकडे असते.
पेड ई पास सुरू केल्याने व्हीआयपी दर्शनासाठी लावला जाणारा तगादा कमी होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताणदेखील कमी होईल.
यंदा उच्चांकी गर्दीची शक्यता
एकीकडे तास दीड तास भाविक देवीच्या दर्शनासाठी रांगेत थांबून असतात. दुसरीकडे अशा आडव्या दाराने हे व्हीआयपी मध्येच घुसतात, याचा प्रचंड त्रास सर्वसामान्य भाविकांना, व्यवस्थापनाला होतो. आता तीन वर्षांनी मोठ्या जल्लोषात अंबाबाईचा नवरात्रौत्सव होणार आहे, त्यात निर्बंधदेखील त्यामुळे होऊन जाऊ दे दर्शन म्हणून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून गर्दीचे नियोजन करावे लागणार आहे.
ताशी हजार व्यक्ती
अनेक भाविकांना तासनतास रांगेत थांबणे शक्य नसते, पुढील प्रवास करायचा असतो. त्यांच्यासाठी पेड ई दर्शन पास सोयीस्कर असणार आहे. पासची किंमत सध्या तरी माणसी २०० रुपये ठरवली असून त्याचे ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. ई पासची दुकानदारी सुरू होऊ नये, यासाठी समितीचे काही कर्मचारीदेखील ऑन द स्पॉट बुकिंग करून देण्यासाठी बसवण्यात येणार आहे.
पेड दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रांग स्वतंत्र असणार आहे. त्याचा त्रास मोफत दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना होणार नाही. ही रांग गाडगे महाराज पुतळ्यापासून पूर्व दरवाज्यातून येईल आणि सटवाई मंदिरापासून भाविकांना आत सोडले जाईल. - शिवराज नाईकवाडे (सचिव. प. म. देवस्थान समिती)