प्रगत तंत्रज्ञानासह तलाठीही बनले अद्ययावत

By admin | Published: April 28, 2015 11:53 PM2015-04-28T23:53:02+5:302015-04-29T01:03:41+5:30

कोल्हापूरही अद्ययावत : महिनाभरात देणार संगणकावर ७/१२ उतारे

Along with advanced technology, Talathi became updated | प्रगत तंत्रज्ञानासह तलाठीही बनले अद्ययावत

प्रगत तंत्रज्ञानासह तलाठीही बनले अद्ययावत

Next

भारत चव्हाण - कोल्हापूर  नवीन तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात उपयोग करणे म्हणजे सुरुवातीच्या काळात जाचक वाटणारी गोष्ट असते. खासगी असो की शासकीय कर्मचारी असो, प्रारंभी कंटाळा करत आजचे काम उद्यावर ढकलण्याच्या मानसिकतेत असतात पण जेव्हा हेच काम अपरिहार्य ठरते, तेव्हा मात्र त्यात लक्ष घालावेच लागते. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ७/१२ व फेरफार उतारे संगणकावरून प्रिंट काढून देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तलाठीही सहा महिने अडखळले. प्रशिक्षण घेतल्यावर मात्र अवघ्या दीड वर्षांत जिल्ह्यातील तब्बल दहा लाखांहून अधिक ७/१२ उताऱ्यांची नोंद संगणकावर करून नव्या तंत्रज्ञानासह आपणही अद्ययावत बनल्याची साक्ष दिली.
गावपातळीपासून शासकीय कागदपत्रांतून हाताने लिहीणारे तलाठी आता येत्या महिन्याभरातच संगणकासमोर बसून ७/१२ उतारे देताना नागरिकांना पाहायला मिळणार आहे. राज्य व केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’चा नारा दिला त्याचवेळी शासकीय कामात आमुलाग्र बदल होणार असल्याची जाणीव झाली होती. राज्यभरात सर्व जिल्ह्यात यापुढे ७/१२ व फेरफार उतारे संगणकावर दिले जाणार आहेत. हाताने लिहून देण्याची पद्धत त्यामुळे रद्द होणार आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हे आव्हानात्मक काम स्वीकारले आणि दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून ते पूर्णही केले.
मुळात हे काम तलाठ्यांनाच करायचे होते पण पहिले सहा महिने सर्वच तलाठी प्रचंड तणावाखाली आले. मात्र, त्यांना प्रशिक्षण देऊन कसे काम करायचे हे शिकविले गेले. त्यामुळे हळू-हळू हे काम पुढे सरकत राहिले. आधी जिल्ह्यातील सर्व तलाठी अद्ययावत झाल्यावर कामाला गती मिळाली. केवळ दीड वर्षांत अत्यंत किचकट तसेच गुंतागुंतीचे वाटणारे काम पूर्ण झाले. या दीड वर्षांत बारा तालुक्यांत १० लाखांंहून अधिक सातबारा उताऱ्याच्या नोंदी संगणकावर करण्यात आल्या. या कामासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यामध्ये प्रत्येक सातबारा उताऱ्यांच्या नोंदी बिनचूक करण्याचे आव्हान होते. जिल्ह्यातील काही सातबारा उतारे हे १० ते १२ पानांचे आहेत. त्यांचे मालक सतत बदलत गेले. त्यामुळे जेवढे मालक होते, त्यांच्या नोंदी त्यावर येणार आहेत.
तलाठ्यांच्या संघटनेने विनंती केल्यामुळे सातबारा उताऱ्यांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने एकदा खात्री करून घेण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे प्रिंट काढून झालेल्या नोंदी योग्य व बिनचूक आहेत का याची खात्री केली जात आहे. याशिवाय उताऱ्यांत काही चुका असल्यास त्या महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १५५ प्रमाणे संबंधितांना दुरुस्त करून घेता येणार आहेत.


- जिल्ह्यात तलाठ्यांची संख्या ४९१
- जिल्ह्यात १० लाख सातबारा उताऱ्यांच्या संगणकावर नोंदी.
- सर्वाधिक १ लाख ९० हजार सातबारा उतारे करवीर तालुक्यात.
-सर्वांत कमी १२ हजार ५०० सातबारा उतारे गगनबावडा तालुक्यात.
- सर्व सातबारा उताऱ्यांच्या सीडी तयार, खात्री करण्याचे काम सुरू.
- सप्टेंबरपासून त्यावर पीक नोंदणी होणार


संगणकावर सातबारा उतारे देण्याचे काम पूर्ण झाले असून प्रायोगिक उतारेही काढण्यात आले. आता केवळ खात्री केली जात आहे. येत्या महिन्याभरात आॅनलाईन काम सुरू होईल.
प्रताप पाटील,
अतिरिक्त जिल्हा सूचना/ विज्ञान अधिकारी


कसे झाले काम पूर्ण ?
संगणकावर सातबारा उतारे देण्याकरीता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक उतारानिहाय माहिती भरण्यात आली. जमिनीचे मालक किती वेळा बदलले,त्यांचे व्यवहार कधी झाले, जागेचे क्षेत्र किती आहे, जमीन किती आणेवारीतील आहे, पीक कोणते आहे, यासंबंधीची सर्व माहिती त्यात भरण्यात आली आहे. काही तलाठ्यांनी या कामाकरीता आॅपरेटर्सचे सहकार्य घेतले. या कामावर जिल्हा स्तरावर नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण हे तर तालुकास्तरावर तहसीलदार काम पाहत आहेत.

Web Title: Along with advanced technology, Talathi became updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.