कोल्हापूर हद्दवाढ: 'ती' पाच गावे घोषित करा, लोक घरात घुसतील; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:29 PM2022-03-30T12:29:02+5:302022-03-30T12:46:37+5:30
सतेज पाटील यांनी ही घोषणा फक्त १२ एप्रिलपर्यंत आहे की नेहमीची आहे, राजकीय आहे की मनापासून आहे हे स्पष्ट करावे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना हद्दवाढीची घोषणा करुन पालकमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. तरीही हद्दवाढ गरजेची असल्याने आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. फक्त सतेज पाटील यांनी ही घोषणा फक्त १२ एप्रिलपर्यंत आहे की नेहमीची आहे, राजकीय आहे की मनापासून आहे हे स्पष्ट करावे. हद्दवाढीत येणाऱ्या पाच गावांची नावेही सांगावीत म्हणजे लोक त्यांच्या घरात घुसतील की नाही हे बघाच असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी लगावला.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी हद्दवाढीचे संकेत देऊन चार-पाच गावांचा समावेश करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यासंबंधी बोलताना आमदार पाटील म्हणाले, मतदारांना आकृष्ट करणारी कोणतीही घोषणा आचारसंहितेच्या काळात करता येत नाही. पण कोल्हापूरची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. अन्यथा भौगोलिक लोकसंख्या वाढीचे फायदे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, स्मार्ट सिटी सारख्या योजनांचा लाभ कोल्हापूरला मिळणार नाही. त्यामुळे आमचा हद्दवाढीला पूर्ण पाठिंबा आहे.
ही निवडणूक संपली की जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. ग्रामीण भागातील लोक हद्दवाढीला विरोध करतात. तेथील निवडणुकीच्या वेळी हे ग्रामीण जनतेची बाजू घेतात. भाजप सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीचा प्रयत्न केला,तेव्हा यांनी ग्रामीण भागातील लोकांना विरोधासाठी उठवून बसवले. शेवटी फडणवीस यांनी प्राधिकरण करून विषय पूर्णपणे संपविला. त्यामुळे सतेज पाटील यांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी.