पर्यायी शिवाजी पूल : नव्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत काँक्रीट काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:32 AM2019-02-27T10:32:26+5:302019-02-27T10:33:51+5:30
पर्यायी पुलाच्या स्लॅबच्या भिंतीचे काँक्रीटचे काम मंगळवारी दिवसभर सुरू होते. सुमारे १०० क्यूबिक मीटरचे हे काम असून, त्यावर देखरेख ठेवण्याची भूमिका उपअभियंता रमेश पन्हाळकर आणि सहायक शाखा अभियंता चित्तेश्वर सोनटक्केयांनी बजावली.
कोल्हापूर : पर्यायी पुलाच्या स्लॅबच्या भिंतीचे काँक्रीटचे काम मंगळवारी दिवसभर सुरू होते. सुमारे १०० क्यूबिक मीटरचे हे काम असून, त्यावर देखरेख ठेवण्याची भूमिका उपअभियंता रमेश पन्हाळकर आणि सहायक शाखा अभियंता चित्तेश्वर सोनटक्केयांनी बजावली.
पर्यायी शिवाजी पुलाच्या स्लॅबच्या भिंतीचे महत्त्वाचे काम सुरूअसतानाही या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कोणीही नसल्याने त्यासाठी तात्पुरत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या पुलाचे क्षेत्रीय प्रबंधक असणारे उपअभियंता संपत आबदार हे वादग्रस्त ठरल्याने पुलाच्या कामाची सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी घेतली होती. त्यामुळे आबदार हे या पुलाच्या कामाकडे फिरकतही नाहीत.
पण कांडगावे यांची दोनच दिवसांपूर्वी पुणे येथे बदली झाली आहे, त्यांनी अद्याप जुना कार्यभार सोडला नसला तरी ते कार्यालयीन कामासाठी मुंबईला गेले आहेत. तर कांडगावे यांच्यासोबत देखरेखीची भूमिका बजावणारे शाखा अभियंता प्रशांत मुंघाटे यांची दोनच दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यातच मंगळवारी पर्यायी पुलाच्या स्लॅबच्या भिंतीचे काँक्रीट टाकण्यात येत आहे.
पण देखरेखीसाठी अधिकारी नसल्याने उपअभियंता रमेश पन्हाळकर आणि सहायक शाखा अभियंता चित्तेश्वर सोनटक्के यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी स्लॅबच्या काँक्रीटचे काम सुरू झाले, ते सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. दरम्यान, कोणताही अडथळा न येता याच वेगाने पुलाचे काम सुरू राहिल्यास एप्रिलमध्ये काम पूर्ण होऊन वाहतूक या नव्या पूलावरून सुरू होण्याची शक्यता ठेकेदार एन. डी. लाड यांनी व्यक्त केली.