अंबाबाई मंदिर विकास आराखडा दाखवा तरी, सतेज पाटील यांचे पालकमंत्र्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 05:22 PM2023-09-19T17:22:55+5:302023-09-19T17:23:16+5:30
'कोल्हापुरातील लोकशाही अबाधित राहण्यासाठी मदत होईल'
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा तयार करण्याचा पालकमंत्री दीपक केसरकर प्रयत्न करत आहेत. हा विकास आराखडा कसा आहे तो दाखवावा, तो तयार करत असताना किमान शहरातील आमदारांना विश्वासात तरी घ्यावे, अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हापूरचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या. कोल्हापुरातील लोकशाही अबाधित राहण्यासाठी मदत होईल, असा टोमणाही त्यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.
मी पालकमंत्री असताना केशवराव भोसले नाट्यगृहात बसून शहरातील नागरिकांना अंबाबाई मंदिर परिसर विकासाची संकल्पना सांगितली होती. त्यांच्याकडून सूचना, हरकती मागविल्या होत्या. पण पालकमंत्री केसरकर नव्याने विकास आराखडा तयार करत आहेत. आम्ही या मातीत जन्मलो आहे. येथील समस्या आम्हाला जास्त कळतात. विकास आराखडा कसा करत आहेत याची माहिती आम्हा आमदारांनाही दिली जात नाहीत. प्रशासनाकडे विचारणा केली तरीही माहिती दिली गेली नाही. त्यासाठी आता तिन्ही आमदारांना लेखी पत्र देण्याची वेळ आली आहे, असे आमदार पाटील म्हणाले.
तीन कोटींचे अनुदान रद्द
आमदार ऋतुराज पाटील यांनी केएमटीचे बस थांबे विकसित करण्याकरिता तीन कोटींचा निधी आणला होता. परंतु सरकार बदलल्याने हा निधी रद्द करण्यात आला. सरकारनेच रद्द केला असेल तर या गोष्टीला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असेही पाटील यांनी सांगितले.
निधी आमचा, तोही देण्यास विलंब
केएमटीकडे नऊ वातानुकूलित बसेस घेण्यासाठी तीन कोटी १५ लाखांचा निधी आम्ही आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून दिला. ऑक्टोबर २०२२ मध्ये निधी दिल्याने या बसेस मे महिन्यापर्यंत येथील अशी अपेक्षा होती. परंतु हा निधी ट्रेझरीतून मिळत नव्हते. इतकी राज्य सरकारची परिस्थिती वाईट झाली. जो निधी आम्ही दिला तो देण्यासही विलंब लावला गेला, अशा शब्दात राज्य सरकारवर आमदार पाटील यांनी टीकास्त्र सोडले.