कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल अपूर्णच, ‘तेवीस’चे झाले ‘छत्तीस’ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:24 AM2017-12-14T11:24:47+5:302017-12-14T12:07:41+5:30

कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तत्काळ कामास सुरुवातही झाली. मात्र, अद्यापही हे संकुल पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. यासाठी २३ कोटी रुपये निधी उपलब्ध केला होता.

Although the 'twenty-three' of 'Chhattis', the sports complex was incomplete | कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल अपूर्णच, ‘तेवीस’चे झाले ‘छत्तीस’ कोटी

कोल्हापुरातील संभाजीनगर येथील क्रीडासंकुलात बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाची अवस्था अशी झाली आहे. अद्यापही काम पूर्ण न झाल्याने दुरवस्था झाली आहे./छाया : आदित्य वेल्हाळ

Next
ठळक मुद्देपहिले पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या गप्पाशूटिंग रेंजचे काम पूर्ण पण साहित्य नाहीशूटिंग रेंज पूर्ण; पण खुली नाहीमहिला व पुरुष स्वच्छतागृहांची वानवाम्हणे दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल!

सचिन भोसले 

कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तत्काळ कामास सुरुवातही झाली. मात्र, अद्यापही हे संकुल पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. यासाठी २३ कोटी रुपये निधी उपलब्ध केला होता. त्यात वाढ होत-होत आता ३६ कोटी रुपये झाले तरी हे संकुल काही केल्या पूर्ण होण्याचे नाव घेईना.

संभाजीनगर रेसकोर्स नाक्याजवळील कैद्यांची शेतीमधील १७ एकर जागा या संकुलासाठी देण्यात आली आहे. यात ४०० मीटर धावपट्टी, टेनिस कोर्ट, खो-खो, कबड्डी, फुटबॉल मैदान, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, शुटिंग रेंज, जलतरण तलाव, आदींचा समावेश होता. यातील गेल्या आठ वर्षांत जलतरण तलाव व शूटिंग रेंज वगळता सर्व मैदाने सर्वांसाठी खुली केली आहेत.

जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हवा होता; म्हणून तज्ज्ञ वास्तुविशारदाकडून त्याचा आराखडा करण्यात आला. त्यात त्रुटी राहिल्याने त्या जलतरण तलावामध्ये संकुलाच्या संरक्षक भिंतींमागून जाणाऱ्या छोट्या ओढ्याचे पाणी मुरू लागले. ही बाब संपूर्ण तलाव बांधून झाल्यानंतर लक्षात आली. त्यामुळे यावर काय करायचे याचा खल करण्यातच तीन वर्षे गेली. प्रत्येक वेळी क्रीडाप्रेमींनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागायची.

ते म्हणायचे, लवकरच काम पूर्ण करून ते सर्वांसाठी खुले करू. या आश्वासनाशिवाय क्रीडाप्रेमींना काहीच मिळत नाही. २५ बाय ५० मीटरच्या या तलावासाठी पुन्हा आराखडा समितीची नेमणूक केली आहे. अजूनही या समितीचा अहवाल संकुल समितीला प्राप्त झालेला नाही.

मुळातच या ठिकाणी तलावासाठी योग्य जागा नाही, हे तज्ज्ञांना का समजले नाही? त्यामुळे यावरील कोट्यवधीचा खर्च फुकट गेला असून त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे की जनतेचा पैसा असाच कोणीतरी लाटून नेणार आहे, ही भावना कोल्हापूरकरांच्या मनात निर्माण होत आहे


गेल्या चार वर्षांपासून जलतरण तलाव, शूटिंग रेंज याबाबत विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीत २० हून अधिक आढावा बैठका झाल्या आहेत; तर हे काम पूर्ण होता-होता दोन विभागीय आयुक्त बदली झाली; तर नव्याने त्या ठिकाणी चंद्रकांत दळवी यांनी पदभार घेतला. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनीही काम लवकर करण्याचे आदेश देत नाराजीही व्यक्त केली; पण अजूनही हे काम काही केल्या पूर्ण होईनासे झाले आहे.

शूटिंग रेंज पूर्ण; पण खुली नाही

गेल्या काही वर्षांमध्ये शूटिंग रेंज पूर्ण व्हावी म्हणून नेमबाजांसह क्रीडाप्रेमी ओरड करीत होते. त्यानुसार १० मीटर, २५ मीटर व ५० मीटरच्या अंतर्बाह्य अशा दोन रेंज तयार झाल्या आहेत; पण त्या संकुल समितीकडे अद्यापही हस्तांतरित झालेल्या नाहीत, अशी ओरड समितीकडून होत आहे.

विशेष म्हणजे यातील लागणारे शस्त्रसाहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे क्रीडा विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ही रेंज अजूनही काही दिवस नेमबाजांना उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही.
 

महिला व पुरुष स्वच्छतागृहांची वानवा

इतके कोटी रुपये खर्चून क्रीडासंकुलाची उभारणी केली; पण त्यात खेळाडूंना लागणाऱ्या प्राथमिक सुविधांचा विचारच केलेला नाही. पुरुष व महिलांकरिता स्वच्छतागृह व चेजिंंग रूम नाहीत. यासह जलतरण तलावासाठी लागणाऱ्या फिल्टरेशन प्लँटची सोय अद्यापही केलेली नाही.

म्हणे दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल!

गेल्या आठ वर्षांत या संकुलाचे काम अक्षरश: कासवगतीने होत आहे. यातील पहिला टप्पा अजूनही पूर्ण होण्याचे नाव घेईना. आता प्रशासनाला दुसऱ्या टप्प्याची घाई लागली आहे. यात खेळाडूंसाठी वसतिगृह, बहुउद्देशीय इमारत यांचा समावेश आहे.

कामाचा दर्जा कोण तपासणार?

यापूर्वी झालेल्या कामाचा दर्जा त्रयस्थांमार्फत तपासण्यात यावा, अशी क्रीडाप्रेमींकडून मागणी होत आहे. काही कामांचे आताच तीनतेरा वाजले आहेत. फरशा उखडणे, आदी कामे नव्याने केली पाहिजेत. त्यातून दर्जात्मक काम किती झाले हे समजेल. तसेच जलतरण तलावाचा आराखडा करतेवेळी या सर्व बाबींचा विचार न करता काम करून ते पूर्ण होईपर्यंत तलावात अशुद्ध पाणी मुरते, ही बाब तज्ज्ञांच्या लक्षात कशी आली नाही? झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीस कोण जबाबदार? असाही सवाल क्रीडाप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. दोषींवर कारवाई करून नुकसानीचा खर्च वसूल करण्याचीही मागणी होत आहे.

२०१४ पासून कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयास पूर्ण वेळ उपसंचालक लाभलेला नाही. अनेक वेळा प्रभारी म्हणून नेमणूक केली विशेष म्हणजे या संकुलाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार विभागीय क्रीडा उपसंचालकांना आहे. त्यामुळे ते बसणार अन्यत्र; तेथून हा सर्व कारभार ते हाकतात. त्यामुळे या संकुलाचे काम काही केल्या पूर्ण होईनासे झाले आहे.

 

विभागीय क्रीडासंकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून शूटिंग रेंजचे साहित्य खरेदीनंतर ते त्वरित सुरू केले जाईल. याशिवाय जलतरण तलावासंदर्भात समितीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल. आहे त्या तलावाबाबत काय करता येईल याकडे अधिक लक्ष दिले जाईल. तोही लवकरच खुला केला जाईल.
- अनिल चोरमले,
विभागीय क्रीडा उपसंचालक

 

जलतरण तलावाबाबत जो चुकीचा निर्णय झाला, त्यावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च कोणाकडून वसूल करायचा याबाबत खात्याने किंवा विभागीय आयुक्तांनी त्वरित निर्णय घ्यावा. ते पैसे जनतेचे आहेत. त्यामुळे त्याबाबत निर्णय आवश्यक आहे. पूर्ण क्षमतेने क्रीडासंकुल त्वरित सुरू करावे. सबब नको.
- सुहास साळोखे,
ज्येष्ठ फुटबॉलपटू

 

Web Title: Although the 'twenty-three' of 'Chhattis', the sports complex was incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.