जीवनात नेहमी आशावाद बाळगा
By admin | Published: January 16, 2016 12:41 AM2016-01-16T00:41:04+5:302016-01-16T00:44:45+5:30
सुधाताई कुलकर्णी : पसायदानातून चांगल्या जगण्याची शिकवण--वि. स.खांडेकर व्याख्यानमाला
कोल्हापूर : जीवन हे सुंदर आहे, असा आशावाद नेहमी बाळगायला हवा. वाईट कल्पना नष्ट करा, चांगले जगायला शिका, असा सल्ला ज्ञानेश्वरी व भगवद्गीता अभ्यासक, सेवानिवृत्त शिक्षिका सुधाताई कुलकर्णी यांनी शुक्रवारी दिला. त्या करवीरनगर वाचन मंदिर येथे पद्मभूषण कै. वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ‘पसायदान’ या विषयावर बोलत होत्या. अध्यक्ष राजाभाऊ जोशी अध्यक्षस्थानी होते.
सुधाताई कुलकर्णी यांनी, सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानातील जीवन कसे जगले पाहिजे, ते कसे असावे, याबद्दलचे विचार मांडले. आपल्या सहवासातील माणसांना प्रेम, शांती दिली तर त्याचा नक्की चांगला उपयोग होतो. मित्र-मैत्रिणींबरोबर मनातील गोष्टी व्यक्त करतो. पण सत्ता, संपत्ती व बळाच्या जोरावर आपण अधिकार गाजवतो. पण, ते चुकीचे आहे. त्या म्हणाल्या, समाजातील नेतेमंडळींनी ‘लोकरक्षण’ आणि ‘लोकशिक्षणा’चे कार्य केले पाहिजे. तरच आपले कार्य सत्कारणी लागले असे म्हणता येईल. इतरांनाही बरोबर घेऊन जाणे हा गुणधर्म असला पाहिजे. नीतीमूल्य असतील तर आपण समाजाचा रथ ओढू शकतो. जीवनशैली सुदृढ असेल तर आरोग्याचे विकार होत नाहीत. संत ज्ञानेश्वरांचे विचार हे निष्ठेचे होते. त्यांचा पारायण सप्ताह मनाची श्रद्धा, मन कसे शांत ठेवावे यासाठी करतो. त्यासाठी संत ज्ञानेश्वर यांच्या ओव्यांचा अभ्यास करावा. त्यातून जीवनाचा खरा अर्थ समजेल.
सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपालक मनीषा शेणई यांनी आभार मानले.