सदैव राहो लक्ष्मीचा वास...
By admin | Published: October 23, 2014 11:00 PM2014-10-23T23:00:27+5:302014-10-23T23:06:57+5:30
थाटामाटात आज, गुरुवारी घरोघरी लक्ष्मी-कुबेर पूजन
कोल्हापूर :
या रक्ताम्बुजवासियी विलासिनी
चंडांशु तेजस्विनी
या रक्तारूधिराम्बरा हरीसखी,
या श्री मनोल्हासिनी
या रत्नाकर मंथन प्रगटिता,
विष्णू स्वया गेहिनी
सा मां पातू मनोरमा,
भगवती लक्ष्मीच पद्मावती..
चौरंगावर सुपारीरूपी गणपती, सरस्वतीचे प्रतीक असलेली लेखणी, घरातली अलक्ष्मी घालवून लक्ष्मीच्या आगमनासाठीची स्वच्छता जपणारी केरसुणी, दिव्यांची आरास, रांगोळीची सजावट, आंब्याची पाने, झेंडूच्या फुलांच्या माळा, कलशावर लक्ष्मीची, तसेच धनाचा अधिपती कुबेराच्या प्रतिमेची स्थापना, मंत्रोच्चार, आरती, धुपदीप, पक्वानांचा नैवेद्य..अशा थाटामाटात आज, गुरुवारी घरोघरी लक्ष्मी-कुबेर पूजन करण्यात आले.
दिवाळी उत्सवातला महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. धन, धान्य, समृद्धीची अधिष्ठाता असलेल्या लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबात सदैव सुख नांदावे, तिचा वास आपल्या घरात राहावा, या श्रद्धेय मनोभावनेतून लक्ष्मी-कुबेराचे पूजन यादिवशी केले जाते. आज संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून ३९ मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता. देवीच्या आगमनासाठी संध्याकाळी दारात सुरेख रांगोळीचा गालिचा काढण्यात आला. आकाशकंदिलांचा झगमगाट आणि पणत्यांच्या मंदज्योतीने जणू तिची ओवाळणी केली.
घरात चौरंगावर लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा, समोर कलश मांडण्यात आला. धण्याच्या राशीवर लक्ष्मीची मूर्ती, तर चौरंगावर शेजारी एका बाजूला गणपती, दुसऱ्या बाजूला सरस्वतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. चौरंगाभोवती रांगोळीची सजावट, दिव्यांची आरास करण्यात आली. पाच फळे, केळी, धूप, दीप, आरतीने देवीची शोड्षोपचारे पूजा केल्यानंतर चिरमुरे आणि बत्ताशांचा प्रसाद आणि गोडधोडाचे नैवेद्य दाखविले.
रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. आप्तेष्ट, शेजाऱ्यांच्या गाठीभेटी, हळदी-कुंकवाने सुवासिनींनी लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला. घरातील लक्ष्मीपूजन झाल्यानंतर श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही मंदिरात भाविकांची झुंबड उडाली होती. (प्रतिनिधी)
कार्यालये, व्यापारी, सराफ पेढींवर पूजा
विविध कार्यालये, व्यावसायिक, दुकानदारांनीही संध्याकाळी लक्ष्मी, वहीपूजन केले. विशेषत: सराफांच्या पेढीवर विविध धार्मिक विधींनी ही पूजा झाली. झेंडूच्या माळा, विद्युत माळा, पणत्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संध्याकाळी गुजरी परिसर उजळून निघाला. लक्ष्मीपूजन तर दुसरीकडे ग्राहकांना सेवा, असे वातावरण होते. दुकानांमध्ये या खास पूजनाला सर्व कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी फटाक्यांची आतषबाजी केली.