‘राजाराम’च्या अध्यक्षपदी अमल महाडिक निश्चित, उपाध्यक्षपदाला 'यांची' नावे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:02 PM2023-04-26T14:02:34+5:302023-04-26T14:02:52+5:30
मागील संचालक मंडळात अमल महाडिक हे संचालक होते, मात्र त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली नव्हती
कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महादेवराव महाडिक यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. उपाध्यक्षपदी यावेळेला कसबा बावड्याला संधी मिळण्याची शक्यता असून तिसऱ्यांदा निवडून आलेले दिलीप उलपे व महाडिक यांचे निकटवर्तीय नारायण चव्हाण यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
‘राजाराम’ कारखान्यावर सहाव्यांदा सत्ता मिळवल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे. साधारणता ४ मे रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा होण्याची शक्यता आहे. मागील संचालक मंडळात अमल महाडिक हे संचालक होते, मात्र त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली नव्हती.
ही निवडणूक महादेवराव महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली तर अमल यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. त्यामुळे अमल यांनाच अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. उपाध्यक्ष पदी दिलीप उलपे, नारायण चव्हाण, तानाजी पाटील यांची नावे चर्चेत असली तरी पहिल्यांदा उलपे किंवा चव्हाण यांना संधी मिळू शकते.