अमल यांच्या निधीला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:51 PM2019-05-30T12:51:21+5:302019-05-30T12:55:20+5:30

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना देण्यात आलेला आमदार अमल महाडिक यांचा विकास निधी का वापरला जात नाही, विकासकामात कसले राजकारण आणताय, असे थेट प्रश्न विचारत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तसेच अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न महानगरपालिका सर्वसाधारण सभेत भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी केला.

Amal's funding was opposed by Congress corporators | अमल यांच्या निधीला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध

अमल यांच्या निधीला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध

Next
ठळक मुद्देअमल यांच्या निधीला काँग्रेस नगरसेवकांचा विरोधमहाडिक-सतेज पाटील वाद : विकासकामात राजकारण कसले आणताय?

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना देण्यात आलेला आमदार अमल महाडिक यांचा विकास निधी का वापरला जात नाही, विकासकामात कसले राजकारण आणताय, असे थेट प्रश्न विचारत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तसेच अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न महानगरपालिका सर्वसाधारण सभेत भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी केला.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संंबंधित नगरसेविकाने काम करूनये, असा खुलासा केल्यामुळे सभेत गदारोळ झाला. दरम्यान, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक सदस्य गैर असल्याचे लक्षात येताच सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी ही सभा कोरमअभावी तहकूब करण्यास सभाध्यक्ष महापौर सरिता मोरे यांना भाग पाडले.

नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक आणि तीन-चार महिन्यांनी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातील राजकीय वाद उफाळून आल्याचे सभेत पाहायला मिळाले. आमदार महाडिक यांच्या विकास निधीवरून अगदी अनपेक्षितपणे सत्तारूढ गटावर निशाणा साधण्याकरिता अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधी गटाच्या सदस्यांनी केला; त्यामुळे सभेत गदारोळ झाला.

भाजपचे किरण नकाते यांनी या मुद्द्याला हात घातला. दक्षिण मतदार संघातील अनेक प्रभागांत आमदार महाडिक यांनी दिलेला निधी वापरला जात नाही. कामांना परवानगी दिली जात नाही, हे लक्षात आणून देताना नकाते यांनी असा भेदभाव का केला जात आहे, याचा खुलासा अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी केली.

त्याचवेळी शहर अभियंता सरनोबत यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. प्रभाग क्रमांक ७० (दीपा मगदूम) मधील राजलक्ष्मीनगरातील एका कॉलनीत कॉँक्रीट पॅसेजचे काम करूनये, असे नगरसेविकेने पत्र दिले असल्याचे सरनोबत यांनी सांगितले. त्यातून गोंधळाला सुरुवात झाली.

विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, विलास वास्कर यांनी शहर अभियंता सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर यांना घेरले. दक्षिण म्हणजे कोणाची जहागिरी आहे का, अशी विचारणा नकाते यांनी केली. सूर्यवंशी यांनी विकासकामात का राजकारण करता, अशी विचारणा केली. शिराळे यांनी सर्व कामे तातडीने सुरूकरा, कामे बंद ठेवूनका, असे सांगितले.

सत्तारूढ बाकावर प्रमुख सदस्यांची संख्या कमी होती. तरीही जयश्री चव्हाण, उमा बनछोडे या विरोधी गट राजकीय आरोप करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विषयपत्रिकेनुसार कामकाज घ्या, सभागृहात कोरम आहे का पाहा, असे सांगत विरोधी गटाच्या मुद्द्यांना बगल देण्याचा प्रयत्न करूलागल्या. त्यावेळी विजय सूर्यवंशी संतप्त झाले. आम्ही सभेचा कोरम करण्यास येथे आलेलो नाही, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू द्या, अशा शब्दांत त्यांनी अधिकाºयांना खडसावले.

सत्तारूढ गटाचे तौफिक मुल्लाणी यांनीही या वादात उडी घेत खुलासा केला. राजलक्ष्मीनगर प्रभागात अमृत योजनेतून पाईपलाईन टाकण्यात आली आहे; त्यामुळे रस्त्याचा जो भाग खराब झाला आहे, तो संबंधित ठेकेदार पूर्ण करून देणार आहेत; त्यामुळे पुन्हा तेथे निधी कशाला खर्च करायचा म्हणून तसे पत्र दिले आहे. संबंधित सदस्य सभागृहात नसताना विकासकामात राजकारण आणल्याचे भासविण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असे सांगितले.

अधिकाऱ्यांनी केली सारवासारव

संबंधित नगरसेविका यांनी कॉँक्रीट पॅसेजचे काम करू नका, असे पत्र दिले असल्याचे आधी सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी नंतर मात्र त्यावर सारवासारव केली. उपशहर अभियंता मस्कर यांनी ज्या भागात काँक्रीट पॅसेज करण्यात येणार आहे, तेथील रस्ता अमृतचे काम केलेल्या ठेकेदाराकडून केला जाणार असल्याचे सांगून, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी किरण नकाते यांनी ही बाब एका प्रभागापुरती नाही, तर दक्षिणमधील सर्वच प्रभागांतील आहे, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

अखेर गोंधळात सभा तहकूब

जयश्री चव्हाण यांनी सभा तहकूब करण्याची मागणी लावून धरली. महापौर मोरे यांना काय करावे सुचेना. शेवटी चव्हाण यांच्यासह अन्य काही सदस्य सभागृहातून बाहेर गेल्याने सभेचा कोरम राहिला नाही; त्यामुळे नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी सभेत कोरम नसल्याची चर्चा बेकायदेशीर ठरेल, असे महापौरांच्या निदर्शनास आणून देत सभा तहकूब केली.

आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सभागृहातील गोंधळ आणि विरोधी गटाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची शहानिशा करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना दिले. त्यांचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे सांगून वादावर पडदा टाकला.

 

Web Title: Amal's funding was opposed by Congress corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.