दिव्यांगांसाठी ‘अमन’ दिशादर्शक ठरेल : अमन मित्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 04:56 PM2019-02-25T16:56:54+5:302019-02-25T16:59:54+5:30
दिव्यांग व स्वमग्नता या विषयावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमन फौंडेशनच्या माध्यमातून चाललेले कार्य कौतुकास्पद आहे. हे काम गरजंूना दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी येथे काढले.
कोल्हापूर : दिव्यांग व स्वमग्नता या विषयावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमन फौंडेशनच्या माध्यमातून चाललेले कार्य कौतुकास्पद आहे. हे काम गरजंूना दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी येथे काढले.
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंपॉवरमेंट आॅफ पर्सन विथ मल्टिपल डिसअॅबिलिटिस (निम्पमेड) व अमन न फौंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित केलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
सिनेअभिनेते सयाजी शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सीपीआरच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दिव्यांग राष्ट्रीय सल्लागार सुधीर भाले (हैद्राबाद), अमन फौंडेशनच्या संस्थापिका दीपा शिपूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. नागाळा पार्कातील एका हॉलमध्ये या कार्यशाळेला सुरुवात झाली.
मित्तल म्हणाले, बदलती जीवनशैली , राहणीमान, आदी विविध कारणांमुळे दिव्यांग, आॅटिझम यासारखे प्रमाण वाढत चाललेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणत: तीन हजार आॅटिस्टिक मुले आहेत. या मुलांकरिता वेगळ्या पद्धतीचे शिक्षण व प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असून, ‘अमन’च्या माध्यमातून सुरू केलेल्या या कार्यास जिल्हा परिषदेमार्फत सर्वतोपरी अशा मुलांचा शोध घेऊन पुढील शिक्षणासाठी प्रयत्न केले जातील.
सयाजी शिंदे म्हणाले, दिव्यांगजणांसाठी काम करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध माध्यमातून प्रशिक्षणाद्वारे अशा मुलांना स्वावलंबी बनविण्याची गरज आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृती झाली पाहिजे. याच भावनेतून ‘अमन’च्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आॅटिझमसाठी कार्य सुरू केले.
दीपा शिपूरकर यांनी संस्थेच्या व स्वमग्न मुलांकरिता सुरू केलेल्या कार्याची माहिती प्रास्ताविकेत दिली. सुधीर भाले यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना व सवलती यांची माहिती दिली. डॉ. सुप्रिया देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यशाळेमध्ये राज्यांच्या विविध जिल्ह्यांतून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणार्थींना ३० सीआरई पॉर्इंटस् मिळणार आहेत. यावेळी संदीप पाटील, शिवकुमार पेडणेकर, सागर परीट, प्रतीक सोळांकूरकर, आदी उपस्थित होते. कपिल मुळे यांनी आभार मानले.