प्रशासक मंडळाचे अमर शिंदे अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:54+5:302021-07-14T04:29:54+5:30
(फोटो- १३०७२०२१-कोल-अमर शिंदे) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघावर मंगळवारी अखेर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. सध्या ...
(फोटो- १३०७२०२१-कोल-अमर शिंदे)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघावर मंगळवारी अखेर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. सध्या दोन सदस्य प्रशासक मंडळ असून, त्याचे अध्यक्ष जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे तर सदस्य म्हणून सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांची नियुक्ती केली आहे.
शेतकरी संघावर २०१५ ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाची सत्ता आली. नेत्यांनी संचालक मंडळ पाठवले; मात्र ते काय कारभार करतात, याकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम संघाच्या कामकाजावर झाले. विविध शाखांतील अपहार, संघाच्या ताब्यातील जागा सोडणे आदी प्रकरणे चांगलीच गाजली. संघाचे एक एक प्रकरण बाहेर येत असतानाही नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याच कालावधीत पाच संचालकांचे निधन झाले, थकबाकीपोटी तीन संचालक अपात्र झाले आणि तीन संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले. संघावर प्रशासक नियुक्तीची कारवाई सुरू झाल्याने अध्यक्ष जी. डी. पाटील यांच्यासह आठ जणांनी सोमवारी राजीनामे दिले. मंगळवारी सहकार विभागाने प्रशासक नियुक्तीची कारवाई केली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे.
संघात ४४ वर्षानंतर पुन्हा प्रशासक
संघात यापूर्वी १९७६-७७ मध्ये संचालक मंडळ बरखास्त करून सदाशिवराव मंडलिक यांच्या अध्यक्षतेखालील सहा जणांचे प्रशासकीय मंडळ आले होते. संघाच्या निवडणुकीसाठी बस वापरल्याचे कारण पुढे करत राजकीय कारवाई केली होती. त्यानंतर तब्बल ४४ वर्षांनंतर पुन्हा प्रशासक नियुक्त झाला आहे.
आज पदभार घेणार
शेतकरी संघाचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अमर शिंदे व सदस्य प्रदीप मालगावे हे उद्या, बुधवारी पदभार घेणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता ते संघाच्या भवानी मंडप कार्यालयात जाणार आहेत.
कोट-
शेतकरी संघाच्या अध्यक्षांसह अकरा संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आल्याने प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. आगामी काळात कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संघाच्या हिताचा कारभार केला जाईल.
- अमर शिंदे (अध्यक्ष, प्रशासक मंडळ शेतकरी संघ)