शेतकरी संघाचे २३ हजार जणांचे सभासदत्व रद्द नव्हे, अक्रियाशील : अमरसिंह माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:07 PM2019-11-16T12:07:58+5:302019-11-16T12:09:44+5:30
शेतकरी सहकारी संघाच्या पोटनियम दुरुस्तीनंतर ज्यांनी ५०० रुपये भाग भांडवलाची पूर्तता वेळेत केली, ते क्रियाशील सभासद झाले. ज्यांनी ही पूर्तता केली नाही, त्यांचे सभासदत्व रद्द केलेले नसून, ते ‘अक्रियाशील सभासद’ आहेत. अजूनही ज्यांना पूर्तता करायची आहे, त्यांनी ती करावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. ज्यांनी ‘मॅग्नेट बझार’शी चुकीचा करार केल्याने संघाला कोट्यवधींचा फटका बसला, त्यांनी संघाच्या हिताचे बोलू नये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या पोटनियम दुरुस्तीनंतर ज्यांनी ५०० रुपये भाग भांडवलाची पूर्तता वेळेत केली, ते क्रियाशील सभासद झाले. ज्यांनी ही पूर्तता केली नाही, त्यांचे सभासदत्व रद्द केलेले नसून, ते ‘अक्रियाशील सभासद’ आहेत. अजूनही ज्यांना पूर्तता करायची आहे, त्यांनी ती करावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. ज्यांनी ‘मॅग्नेट बझार’शी चुकीचा करार केल्याने संघाला कोट्यवधींचा फटका बसला, त्यांनी संघाच्या हिताचे बोलू नये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
अमरसिंह माने म्हणाले, नोव्हेंबर १९९८ मध्ये तत्कालीन अध्यक्ष आनंदराव पाटील-चुयेकर, बाबा नेसरीकर, सहायक कार्यकारी संचालक सुरेश देसाई यांनी २५ रुपयांवरून १०० रुपये भाग भांडवल करीत ११ हजार सभासद रद्द केले. २०१३ ला वसंतराव मोहिते अध्यक्ष व अजितसिंह मोहिते कार्यकारी संचालक असताना ९७ वी घटनादुरुस्ती स्वीकारून त्यांनी १०० रुपयांवरून ५०० रुपये भाग भांडवल करण्याचा निर्णय घेतला आणि अंमलबजावणी करीत मार्च २०१५ पर्यंत भाग भांडवलाची पूर्तता करण्यास सांगितले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये आम्ही सत्तेवर आलो. भाग भांडवलाची पूर्तता करण्यासाठी आणखी मुदतवाढ दिली.
कायद्यानुसार पूर्तता न करणारे सभासद अक्रियाशील झाले. त्यांचे सभासदत्व रद्द केलेले नाही; म्हणजे घटनादुरुस्ती आणि तिची अंमलबजावणी तुम्ही केली आणि खापर आमच्या डोक्यावर का फोडता? या सभासदांचे संघ उभारणीतील योगदान लक्षात घेऊन अजूनही या सभासदांनी पूर्तता केली तर ते क्रियाशील होऊ शकतात.
‘मॅग्नेट बझार’शी करार करताना आनंदराव पाटील-चुयेकर अध्यक्ष, अॅड. अशोकराव साळोखे उपाध्यक्ष, तर सुरेश देसाई सहायक कार्यकारी संचालक होते. त्यावेळचे करार पाहिले तर या मंडळींचे खरे रूप समोर येईल. एका करारावर कंपनीच्या प्रतिनिधींच्या सह्याच नाहीत; त्यामुळे १२ वर्षांचे सहा कोटींचे भाडे अडकले आहे, याला जबाबदार कोण?
पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्यांनी संघाला कोट्यवधींना बुडविले असून, त्याची वसुली करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. याउलट या मंडळींनी कर्मचाऱ्यांचा थकविलेला ३७ लाखांचा प्रॉव्हिडंट फंड भरून, इतर देणी देऊन संघ २८ लाखांच्या नफ्यात आणल्याचे अध्यक्ष माने यांनी सांगितले.
संघाच्या हितास बाधा होईल, असे वर्तन सुरेश देसाई यांनी केल्यानेच सर्वसाधारण सभेत त्यांचे सभासदत्व रद्दचा ठराव झाला. त्याचे अनुकरण केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी अध्यक्ष युवराज पाटील, जी. डी. पाटील, बाळकृष्ण भोपळे, विजयकुमार चौगले, शशिकांत पाटील, विनोद पाटील, अप्पासाहेब निर्मळ उपस्थित होते.
अपहार नव्हे, उधारी
संघाच्या विविध शाखांत माल उधारीवर दिला, त्याची वसुली न झाल्याने संबंधितांवर फौजदारी दाखल केली. हा अपहार नव्हे, तर उधारी असल्याचे अध्यक्ष माने यांनी सांगितले.
मोहिते, देसार्इंकडून संघाची बदनामी
निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून वसंतराव मोहिते व सुरेश देसाई यांच्याकडून संघाची बदनामी सुरू आहे. राजकारणाच्या वेळी जरूर राजकारण करू; पण चांगल्या चाललेल्या संघाची बदनामी करू नका, असे आवाहन युवराज पाटील यांनी केले.
मानसिंगरावांच्या शिफारशीनेच २१ लाख अडकले
साबळेवाडी येथील शाहू शेती सेवा केंद्राला उधारीवर माल देण्याची शिफारस तत्कालीन कार्यकारी संचालक मानसिंगराव जाधव यांनीच केली होती. त्यातील २१ लाख रुपये अडकल्याचा आरोप अध्यक्ष माने यांनी केला.
दृष्टिक्षेपात क्रियाशील-अक्रियाशील
- क्रियाशील संस्था सभासद - १४५८
- व्यक्ती सभासद- १४९७७
- अक्रियाशील संस्था सभासद- ४००
- अक्रियाशील व्यक्ती सभासद- २०७८२.