अमरनाथ यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणार सहा हजार भाविक, नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:19 AM2019-06-05T10:19:56+5:302019-06-05T10:22:41+5:30
कोल्हापूर : धार्मिक महत्त्व आणि निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेल्या अमरनाथ यात्रेसाठी कोल्हापुरातून यंदा सहा ते सात हजार भाविक रवाना होत ...
कोल्हापूर : धार्मिक महत्त्व आणि निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेल्या अमरनाथ यात्रेसाठी कोल्हापुरातून यंदा सहा ते सात हजार भाविक रवाना होत आहेत. यंदा ही यात्रा २० जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत होत असून, त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे.
अमरनाथ येथे दरवर्षी २० जून ते आॅगस्ट या दीड महिन्याच्या कालावधीत शिवशंकराचे अधिष्ठान असलेल्या बर्फाचे शिवलिंग तयार होते. या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला आणि भारतातील स्वर्ग असलेले जम्मू-काश्मीरचे पर्यटन करण्यासाठी देशभरातून लाखो लोक अमरनाथ यात्रेसाठी जातात.
समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंची असल्याने नैसर्गिकदृष्ट्या खडतर प्रवास आणि आत्मघाती हल्ले या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंच्या सोईच्या दृष्टीने जम्मू-काश्मीर शासन, सीआरपीएफ, बीएसएफ अशा सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून दरवर्षी यात्रेची तारीख ठरविली जाते. यामध्ये भाविकांची सुरक्षा, प्रवास व जेवणाची सोय, राहण्यासाठी लंगरची उभारणी, स्वच्छतागृह अशा सोईसुविधा निर्माण केल्या जातात. यात्रेआधी एक महिना ही तयारी सुरू असते.
यंदा २० तारखेपासून या यात्रेला सुरुवात होत असून, त्यासाठी आजवर देशभरातून दोन लाख ६० हजार भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सहा ते सात हजार भाविकांचा समावेश आहे. पहिल्यांदाच अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक टूर कंपन्या अथवा टूर आॅपरेटर्सना प्राधान्य देतात. त्यांची संख्या जवळपास ६० टक्के आहे; तर दरवर्षी अथवा दर दोन वर्षांनी अशी वारंवार यात्रा करणाऱ्या भाविकांना तेथील परिसर चांगला माहीत झाल्याने ते स्वतंत्ररीत्या जाणे पसंत करतात.
प्रवास असा...
देशातील विविध भागांतील यात्रेकरू जम्मूमध्ये एकत्रित येतात. येथून अमरनाथ येथील गुहेपर्यंत जाण्यासाठी पहेलगाम, सोनमर्ग, बालटाल असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरचीसुद्धा सोय आहे. पायी यात्रा करायची असेल तर चार दिवस लागतात. कोल्हापूर ते अमरनाथ आणि पुन्हा कोल्हापूर असा जवळपास १० दिवसांचा यात्रेचा कालावधी असतो.
धार्मिक, आध्यात्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्यादेखील चमत्कार असलेली अमरनाथ यात्रा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. काश्मीर व्हॅलीमधील हे सर्वांगसुंदर ठिकाण आहे; पण यात्रेला जाण्यापूर्वी भाविकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेणे आणि शारीरिक क्षमता वाढविणे गरजेचे आहे.
- विनोद कांबोज,
ज्येष्ठ गिर्यारोहक व साहसी पर्यटनाचे आयोजक