अमरसिंह पाटील जाहिरात पुरवणी फायनल लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:48+5:302021-06-04T04:18:48+5:30
सुदर्शन पाटील, कोल्हापूर पहिल्याच प्रयत्नात पहिल्या क्रमांकाची मते घेत कोडोलीचे अमरसिंह यशवंत पाटील यांनी गोकुळ दूध संघात संचालक म्हणून ...
सुदर्शन पाटील, कोल्हापूर
पहिल्याच प्रयत्नात पहिल्या क्रमांकाची मते घेत कोडोलीचे अमरसिंह यशवंत पाटील यांनी गोकुळ दूध संघात संचालक म्हणून कारकिर्दीची नवी इनिंग सुरू केली. २०१७ मधील जिल्हा परिषद व २०१४ मधील विधानसभेचा अपवाद वगळता २९ वर्षांच्या राजकीय वाटचालीत अजिंक्य राहून शिवाजी विद्यापीठ, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक अशा विविध संस्थांमध्ये आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला. अभ्यासू व्यक्तिमत्त्व, मांडण्याची आक्रमक पद्धत, प्रश्न तडीस नेण्याची धडपड हे त्यांचे गुण कायमच त्यांना कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहण्यास भाग पाडतात. यातूनच त्यांची ‘कामाचा माणूस’ अशी ओळखही दृढ केली आहे. आता गोकुळच्या निमित्ताने त्यांच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.
तत्कालीन पन्हाळा, गगनबावडा, वैभववाडीचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे चिरंजीव या ओळखीच्याही पलीकडे नवी ओळख अमरसिंह पाटील यांनी अल्पावधीतच मिळवली आहे. तब्बल २५ वर्षे आमदारकी नांदणाऱ्या घरात जन्मलेल्या अमरभाऊंना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. वडील आमदार असतानाच १९९२ पासून जिल्हा युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून राजकीय वाटचालीस सुरुवात केली. युवकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पाच वर्षे जबाबदारी पार पाडत असताना १९९७ मध्ये त्यांनी पन्हाळ्यातील सातवे मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी नशीब आजमावले. काम करणाऱ्यांच्या मागे देव उभा राहतो म्हणतात, तसेच अमरभाऊंच्या बाबतीत झाले. पहिला प्रयत्न असताना सर्वांत तरुण सदस्य म्हणून जनतेनेही त्यांना जिल्हा परिषदेवर निवडून दिले. सलग १५ वर्षे जिल्हा परिषदेत नेतृत्व करताना त्यांना शिक्षण व अर्थ समिती सभापती म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. हा काळ अमरभाऊंच्या आयुष्यातील ऐन भराचा होता. त्यांचा आक्रमकपणा, प्रश्नाचा पिच्छा पुरवण्याची वृत्ती पाहून त्यांना जिल्हा बॅंकेवरही संचालक म्हणून संधी मिळाली. अर्थ सभापती म्हणून जिल्हा परिषदेच्या आर्थिक नाड्या सांभाळतानाच जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. जिल्हा परिषद गाजवत असताना, २०१२ मध्ये पारंपरिक व हक्काचा सातवे मतदारसंघ आरक्षित झाला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नाइलाजाने त्यांना पंचायत समिती लढवावी लागली. तेथून ते निवडून आले, पण कार्यक्षेत्र कमी झाले. या काळात तालुक्यासह जिल्ह्यातही बरीच राजकीय समीकरणे बदलली. विधानसभेच्या मतदारसंघाचीही २००९ मध्येच पुनर्रचना झाली. पन्हाळ्याचा निम्मा भाग करवीर मतदारसंघाला जोडला गेला, तर निम्मा शाहूवाडीला. मतांच्या विभागणीचा फायदा शाहूवाडीला होऊ लागला आणि हळूहळू पन्हाळ्यातील दादा घराण्याच्या साम्राज्याला धक्के बसू लागले. एका बाजूला वारणेचे सावकर विनय कोरे, दुसरीकडे सत्यजित आबा पाटील यांच्यामुळे राजकारणाचा नवा पट मांडण्याच्या दिशेने वारे वाहू लागले. तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याशी जवळीक साधत स्वाभिमानीत प्रवेश करून २०१४ मध्ये पन्हाळा-शाहूवाडी विधानसभेची निवडणूक लढवली; पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव आयुष्यातील पहिलाच असल्याने थोडीशी नाराजी आली तरी जिद्द, चिकाटी मुळचीच अंगात असलेल्या अमरभाऊंनी न थांबता २०१७ मध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली, पण बदललेल्या राजकीय समीकरणामुळे त्यांना तेथेही जनसुराज्यकडून पराभूत व्हावे लागले. पाठोपाठच्या दोन पराभवामुळे थांबले ते अमरभाऊ कसले..? त्यांनी मतदारसंघातील बदललेल्या राजकारणाचे वारे ओळखत जनसुराज्यचे विनय काेरे यांच्याशी हातमिळवणी केली. तिखट प्रतिक्रिया आल्यातरी अमरभाऊंनी आपला निर्णय पटवून देत कार्यकर्त्यांचे मन वळवले. त्याचा लाभ त्यांना गोकुळच्या निवडणुकीत झाला. कोरे यांनी आपल्या कोट्यातून अमरभाऊंना उमेदवारी दिली आणि पहिल्या क्रमांकाच्या मताने निवडून आले.
राजकारणातील अजिंक्यत्वाची परंपरा सांभाळणाऱ्या पाटील घराण्यात जन्मलेल्या अमरभाऊंनीही तीच परंपरा पुढे नेली. दोन वेळच्या पराभवाचा अपवाद वगळता सातत्याने यशाची माळ गळ्यात घेऊन कार्यकर्त्यांना बळ देणारे अमरभाऊ आता नव्या दमाने सक्रिय झाले आहेत. पुन्हा एकदा त्यांच्यातील अभ्यासू नेतृत्वाला नव्याने धार चढणार आहे. राजकारणातील पटावर मुत्सद्दीपणा व संयम किती महत्त्वाचा असतो, हे स्वत: त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यामुळेच चार वर्षांच्या खडतर कालखंडानंतर ते पुन्हा नव्याने झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
चौकट
त्यांना मिळालेले हे यश म्हणजे एका उचित ध्येयाने केलेली वाटचाल म्हणता येईल. निवडणुकीत विजयी व्हायचे असेल तर इतरांपेक्षा काकणभर सरस असायला हवे. यशस्वी माणसे इतरांपेक्षा काकणभर सरस असतात. याच काकणभर जादा सरसपणामुळे त्यांना हे यश मिळाले आहे. यशाची खात्री, निश्चित योजना, नियोजन, चिकाटी यामुळे त्यांना हे साध्य झाले. अपयश हा यशाचा महामार्ग आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या प्रयत्नांचा वेग पहिल्यापेक्षा दुप्पट असला पाहिजे.
चौकट
बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आमदार विनय कोरे (सावकर) यांच्याबरोबर राजकीय व सामाजिक दिलजमाई करण्याचे ठरवले. या तडजोडीला गोकुळच्या निमित्ताने पहिले फळ आले. यानिमित्ताने अमरभाऊंनी आमदार विनय कोरे यांच्याप्रती बाळगलेली तडजोडीची बांधिलकी, दर्शवलेली निष्ठा गोकुळच्या निवडणुकीमध्ये यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेली. त्यांच्या या यशामध्ये त्यांचे पुतणे जयंत पाटील (माजी पंचायत समिती सदस्य) यांचेही मोठे योगदान लाभले. अमरभाऊंच्या नेतृत्वाखालील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, यशवंत शिक्षण समूहातील कर्मचारी, मित्र परिवार यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या सर्वच दूधउत्पादक ठरावधारक मतदारांपर्यंत पोहचण्याचे, तसेच राजश्री शाहू शेतकरी पॅनेलची भूमिका मतदारापर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी सकारात्मक विश्वास ठेवून केले. विजयाचे निश्चित अमरभाऊंच्या कामाची हातोटी, गुणवत्ता मतदारांपर्यंत व्यवस्थित पोहचवली. त्यांनी सत्तेत असताना केलेली कामे लोकांच्या लक्षात होती. त्यांनी केलेली कामे अशी होती की, लोकांना त्यांच्या कौशल्याचा, कामगिरीचा, अभिमान वाटत होता. हेच कामाचे प्रशस्तिपत्र या निवडणुकीमध्ये त्यांना नक्कीच उपयुक्त ठरले.
चौकट
कोणतेही यश योग्य गुरू असल्याशिवाय ते आपल्या पदरी पडत नाही. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय व प्रेरणेशिवाय ते अशक्य आहे. अमरभाऊंना आमदार विनय कोरे व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासारख्या राज्याच्या नेत्यांचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे इथून पुढच्या राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये भवितव्याचे मार्ग निश्चित करण्यामध्ये उपयोगी ठरणार आहेत हे नक्की. माजी आमदार चंद्रदीप नरके व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत असलेले रक्ताचे नातेही त्यांना वाटचालीस नव्याने उभारी देणारे ठरले.
चौकट
मतदारसंघ पुनर्रचना झाल्यामुळे गट करवीर मतदारसंघात विभागला गेला तरी, पन्हाळामध्ये अजूनही दादा गटाची तीस ते बत्तीस हजार मते हक्काची आहेत. याची जाणीव असल्याने कोरे यांनी अमरभाऊंना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. त्याचा फायदा कोरे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झाला. २०१४ मधील पराभवानंतर विनय काेरे यांनी जोरदार कमबॅक करत आमदारकी मिळवली. त्यात अमरभाऊंचे योगदानही मोठे आहे. याची परतफेड कोरे यांनी गोकुळमध्ये केली.
कारकीर्द
१९९२ ते १९९७ जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष व शिवाजी विद्यापीठ प्रतिनिधी
१९९७ ते २०१२ सलग १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण सभापती म्हणून काम
२००७ ते २०१२ जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक व उपाध्यक्ष
२०१२ ते १७ पंचायत समिती सदस्य
२०१४ स्वाभिमानीकडून विधानसभा लढवली, पण पराभूत
२०१७ जिल्हा परिषदेत सातवे मतदारसंघातून जनसुराज्यकडून पराभव