खणदाळच्या अमितचा मराठी चित्रपटांत आवाज
By admin | Published: March 9, 2017 11:50 PM2017-03-09T23:50:08+5:302017-03-09T23:50:08+5:30
‘रे पावसा’ गीत : ‘मित’च्या यशाने खणदाळसारख्या कन्नड-मराठी मिश्रभाषिक गावाचे नाव चित्रपटसृष्टीत
संजय थोरात -- नूल -व्हाईट ओनियन इंटरटेनमेंट या बॅनरखाली तयार झालेला ‘प्रेमाय नम्:’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला. या चित्रपटात खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथील अमित अशोक गोरुले या युवा गायकाने पार्श्वगायन केले आहे. त्याच्या आवाजातील ‘रे पावसा’ हे गीत सर्वत्र गाजत आहे. अमितच्या या यशाने खणदाळसारख्या कन्नड-मराठी मिश्रभाषिक गावाचे नाव बॉलिवूडच्या नकाशावर आले आहे.
अमितला चौथ्या वर्षांपासून गायनाची आवड आहे. संगीत विशारद मच्छिंद्र बुवा यांनी त्याला घडविले आहे. अनेक वर्षे तो कन्नड, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. या क्षेत्रात करिअर करायचे या जिद्दीने आर्थिक परिस्थितीवर मात करीत वेळप्रसंगी उपाशिपोटी राहून त्याने हे यश मिळविले. उत्तम चोरडे निर्मित, जगदीश वाठारकर यांचे दिग्दर्शन असलेला ‘प्रेमाय नम्:’ मराठी चित्रपट पश्चिम महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
चंद्रशेखर जानवाडे व के. संदीपराज यांचा संगीत साज आणि चित्रपटात टायटल साँग असलेले ‘रे पावसा’ या गाजत असलेल्या गीतास अमितचा सुरेल आवाज लाभला आहे. देवेंद्र चौगुले, रूपाली कृष्णराव, सुरेखा कुडची, प्रकाश धोत्रे, भरत दैनी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाचे रामोजी फिल्म सिटी, मालवण, कागल, कोल्हापूर, सांगली येथे चित्रीकरण झाले आहे. मालवण किनारपट्टीवर समुद्रात डायव्हिंगच्या माध्यमातून या चित्रपटाचे प्रमोशन झाले. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच संपूर्ण गीत पाण्याखाली चित्रित करण्यात आले. पावसाळ्यातील ‘रे पावसा’ गीत अमितने गावून बॉलविूडमध्ये प्रवेश केला आहे. ‘महारथा’, ‘कार मुगीलु’ हे दोन कन्नड चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. त्यात अमितची तीन गीते आहेत, तर इन्फिनिटी चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ झाला आहे.
कॉ. गोविंद पानसरेंच्या जीवनावरील ‘तरंग’ लघुपटास त्याचे संगीत व पार्श्वगायन आहे. ‘ओ जीव वे’ हा त्याचा स्वत:चा सात गीतांचा कन्नड अल्बम प्रसिद्ध झाला आहे.
‘जागो इन्सानो’ या त्याच्या ख्रिश्चन गीतांच्या अल्बमला परदेशात
मागणी आहे. महाराष्ट्रातील या
युवा गायक संगीतकाराने कर्नाटकातील चित्रपटसृष्टीत योगदान दिले आहे.