पोटाला चिमटा घेऊन पैलवान घडवणारी ‘आमशी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2017 01:11 AM2017-04-24T01:11:03+5:302017-04-24T01:11:03+5:30
निवासी तालमीचे जिल्ह्यातील पहिले गाव : कसदार मातीच्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
‘निर्मल ग्राम’, ‘एक गाव, एक गणपती’ या सामाजिक उपक्रमांमुळे राज्यपातळीवर नाव पोहोचलेल्या करवीर तालुक्यातील आमशी गावाची खरी ओळख ही ‘मल्लांचे गाव’ म्हणूनच जिल्ह्यासह राज्यात आहे. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी असतानाही पोटाला चिमटा देऊन पैलवानकी सांभाळणाऱ्या येथील संस्कृतीमुळे घरटी मल्ल पाहावयास मिळतो. गावोगावी तालमींची संख्या काही कमी नाही; पण शहराप्रमाणे निवासी तालीम केवळ येथेच पाहावयास मिळते. येथील मातीतच वेगळी ताकद असल्याने गावातील अनेक मल्लांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे.
कोल्हापूरपासून २५ किलोमीटर अंतरावर सातेरी डोंगराच्या कुशीत आमशी हे गाव वसलेले आहे. गावाच्या आजूबाजूला डोंगर असल्याने येथे बागायत क्षेत्र फारच कमी आहे. त्यामुळे गवंडीकाम, सेंट्रिंगकाम, ऊसतोडणी मजुरी ही येथील सामान्य माणसाची उपजीविकेची साधने आहेत. परिणामी येथील कुटुंबांची परिस्थिती तशी जेमतेमच आहे. पैलवानकी करणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा विषय असतो, त्याला कारणेही तशीच असून, यासाठी येणारा खर्च परवडत नाही. तरीही या गावात गेले अनेक वर्षांपासून कुस्तीची परंपरा जोपासली आहे. ७० वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन तालीम बांधली. शिवाजी राणोजी पाटील, भाऊ जोती पाटील, कै. शिवाजी तुकाराम पाटील यांनी पुढाकार घेत कुस्ती रुजवली. त्यानंतर लहान मुलांत कुस्तीची आवड निर्माण होण्यासाठी दरवर्षी न चुकता या मंडळींनी छोटी-मोठी मैदाने भरविली. दिवसभर शेतात काम करायचे आणि सायंकाळी तालमीत व्यायामासाठी तरुणांची झुंबड उडायची. तालुक्यातील कोणत्याही गावात यात्रेचे मैदान असले की २५-३० मल्ल दंड थोपटताना दिसतातच; पण काळानुरूप कुस्ती व कुस्तीचे डावपेच बदलत गेले. त्यादृष्टीने येणाऱ्या मल्लांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी गावातील मल्लांनी एकत्रित येत १९९५ ला निवासी तालमीची संकल्पना मांडली आणि ती सत्यात उतरली. हनुमान तालमीत सुमारे ५०, तर साई तालमीत ४० हून अधिक मल्ल निवासासाठी आहेत. पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे, गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे, हातकणंगले तालुक्यातील टोप, तर करवीर तालुक्यातील उपवडे, पासार्डे, आरळे, सावर्डे, चाफोडी, सावर्डे या गावांतील १२ ते १९ वर्षे वयोगटातील मुले येथे सरावासाठी आहेत. १९९९ च्या दरम्यान शरद पाटील याने ‘करवीर केसरी’चा किताब पटकावीत आमशी गावाला पहिली गदा मिळवून दिली. वस्ताद राजाराम पाटील, विकास पाटील, मदन पाटील हे प्रशिक्षक आहेत. विकास पाटील हे आक्रमक कुस्तीपट्टू; पण त्यांना नोकरीची संधी मिळाली नाही. साई सेंटरमध्येही विश्रांती पाटील, स्मिता पाटील, रसिका कांबळे, राधा पाटील, दिशा पाटील, आदी मुली सराव करीत आहेत. विश्रांती पाटील हिने राष्ट्रीय पातळीवर धडक मारली असून, आॅलिम्पिकचे स्वप्न उराशी बाळगून सराव करीत आहेत.
पालकांना लाल मातीची आस
घरात पैलवान तयार करणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असते. येथील बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही मिळणाऱ्या मजुरीतून संसाराचा गाडा चालवीत मुलांना खुराकासाठी पैसे देणारे पालक येथे पाहावयास मिळतात. यातून त्यांची लाल मातीबद्दलची आस दिसून येते.
कळायला लागले
की मुले तालमीत...
येथील प्रत्येक माणसाच्या रक्तातच कुस्ती भिनली आहे. त्यामुळे मुलं जन्माला आली की प्रत्येक पालक कुस्तीचेच स्वप्न बघतो. त्यामुळे लहान मुलांना कळायला लागले की ते थेट तालमीच गाठते.
पीळदार, भरदार शरीरयष्टी
गावातून सहज फेरी मारली की कान मोडलेले, पीळदार व भरदार ध्येययष्टी असणारे तरुण पाहावयास मिळतात. येथील पैलवानाचा रुबाब पाहता गावात सोडाच; पण शेजारील गावात कोणी फारसे नादाला लागत नाहीत. लहानपणापासून खाल्लेला खुराक व व्यायाम यामुळे येथील वयोवृद्ध मंडळींच्या चेहऱ्यावर तेवढाच रूबाब दिसतो.
कुस्तीबरोबर अभ्यासही
पहाटे साडेपाच वाजल्यापासून मुलांचा सराव सुरू होतो. १५ किलोमीटर धावणे, लढती हे नऊपर्यंत पूर्ण करायचे. ९ ते १० अभ्यास करून ११ वाजता गावातच शाळेला जायचे. शाळेतून आल्यानंतर पुन्हा व्यायाम आणि अभ्यास सुरू राहतो. शनिवारी पाढे पाठांतर, तर रविवारी इंग्रजीचा तास सरदार पाटील घेत असल्याने शैक्षणिक प्रगतीही नेत्रदीपक आहे. तुपात बनविलेला नाष्टा, जेवण मुलांना दिले जाते.
वस्ताद काय म्हणतात..
शहरातील निवासी तालमीपेक्षा अत्यल्प खर्चात येथे प्रशिक्षण दिले जाते. येथील मातीलाच वेगळा कसदारपणा असल्याने अद्ययावत सुविधा नसतानाही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मल्लांनी नाव केले. मोठे कुस्ती संकुल उभा करण्याचा मानस आहे; पण त्यासाठी शासकीय मदतीची गरज आहे.
- राजाराम पाटील (वस्ताद)
‘महाराष्ट्र केसरी’साठी
संग्रामच्या जोर-बैठका
येथील मल्लांनी राष्ट्रीय व अांतरराष्ट्रीय पातळीवर धडक मारली आहे. गावकऱ्यांची एकच इच्छा राहिली आहे, ती ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याची. त्यासाठी संग्राम पाटीलकडे सारा गाव नजर लावून बसला आहे. हिंदकेसरी युद्धवीर यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे. साडेसहा फूट उंच व पीळदार ध्येययष्टीच्या ‘संग्राम’कडे पाहिले की ‘डब्बल महाराष्ट्र’ केसरी होण्यापासून त्याला कोणी रोखू शकेल असे वाटत नाही. पण, यासाठी कुस्तीप्रेमींचे आर्थिक पाठबळही महत्त्वाचे आहे.सांस्कृतिक
कार्यातही एकोपा
गावात राजकीय संघर्ष टोकाचा असला तरी सामाजिक व सांस्कृतिक कार्यातील एकी कमालीची आहे. १९९५ पासून गेली २१ वर्षे ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.