कोल्हापुरातील अंबाबाई परिसर विकासात दुटप्पीपणाचा अडथळा, उठसूठ विरोध चुकीचाच 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:07 PM2023-03-02T13:07:09+5:302023-03-02T13:07:52+5:30

एकीकडे विकास होत नाही म्हणून ओरड करायची आणि विकासाचा विचार सुरु झाल्यावर लगेच विरोध करायचा असा दुटप्पीपणा काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत.

Ambabai area in Kolhapur is a barrier to double standards in development | कोल्हापुरातील अंबाबाई परिसर विकासात दुटप्पीपणाचा अडथळा, उठसूठ विरोध चुकीचाच 

संग्रहीत छाया

googlenewsNext

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर बाहेरील महाद्वार रोडवरील मिळकतींच्या संपादनासाठी देवस्थान समितीने पहिले पाऊल उचलले तर लगेचच काही घटकांनी गैरसमज निर्माण करून विरोध सुरू केला आहे. एकीकडे विकास होत नाही म्हणून ओरड करायची आणि विकासाचा विचार सुरु झाल्यावर लगेच विरोध करायचा असा दुटप्पीपणा काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. तोच या विकासात मुख्य अडथळा आहे. तो दूर होत नाही तोपर्यंत अंबाबाई परिसर विकास हवेतच राहणार आहे.

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करा, धार्मिक व पर्यटनस्थळ करा, भाविकांना सोयीसुविधा द्या अशी मागणी करणारे, त्यासाठी आग्रही असणारेच विरोधासाठी पुढे येतात. हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती असल्याने अगदी मंदिराच्या भिंतीला लागून घरे, दुकानगाळे, वाहनांची गर्दी, फेरीवाले, यात्रीनिवास, व्यापारी संकुल असल्याने मिळकत धारकाला तिथे एक इंचभरही जास्तीच्या जागेत विकास करता येत नाही. दुचाकी वाहने नेता येत नाही, मोटारकाडीची तर गोष्टच सोडा. ही परिस्थिती बदलायची असेल तर परिसर मोकळा केला पाहीजे.

विकास हवा असेल तर तडजोडीचीही तयारी ठेवावी लागेल. मिळकतधारकांचे नुकसानच होणार असेल तर विरोध नक्की करावा. पण वस्तुस्थिती माहिती नसताना किंवा पूर्वग्रह दूषित मानसिकता ठेवून पहिल्या टप्प्यावरच विरोध केला जात आहे. त्यासाठी ठरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे.

आग्रह धरायला हवा...

संपादनाला विरोध करण्याऐवजी आमचे समाधानकारक पुनर्वसन कसे करणार यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरायला हवा. घरांच्या संपादनाचा मोबदला किती मिळणार, नुकसान होणार नाही ना, व्यवसाय, दुकानांची पर्यायी व्यवस्था कोठे करणार, तिथे व्यवसाय व्हावा, भाविक-पर्यटक यावेत यासाठी काय व्यवस्था लावणार यासाठी प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्याकडून तसा आराखडा करून घेता येईल. पण विकासच करायचा नाही ही भूमिका योग्य नाही.

विश्वासात घ्या..

पिढ्यानपिढ्या किंवा आयुष्याची जमापूंजी घालूून निर्माण केलेली एखादी गोष्ट विकास प्रकल्पासाठी देताना अनेक प्रश्न, शंका निर्माण होणार, असुरक्षिततेची भावना असणार हे साहजिक आहे. पण त्यांचे योग्य पद्धतीने व योग्य मार्गाने निराकरण करणे गरजेचे आहे. आता मिळकतधारकांना विनंतीपत्र पाठवले असले तरी तुमचे नुकसान होणार नाही उलट फायदाच होईल हा विश्वास देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये निर्माण केला तर हा संपादनाचा प्रवास सोपा होणार आहे.

महामार्ग, विमानतळाचे उदाहरण..

सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी भूसंपादन झाले असून सर्व मिळकतधारकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला मिळाला आहे. अगदी पडीक, डोंगराळ जमिनीला ही चांगला दर शासनाने दिला. कोल्हापूर विमानतळासाठी देखील चांगला मोबदला देऊन भूसंपादन झाले आहे. अंबाबाई मंदिर परिसर तर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे तिथेही असा मोबदला मिळू शकतो. आणि मंदिराच्या आजूबाजूचे भूसंपादन झाल्याशिवाय मंदिर मोकळे कसे होणार..? जागा तर मंदिर परिसरातीलच घ्यावी लागेल. फुलेवाडी किंवा पाचगावची जागा घेऊन मंदिर परिसराचा विकास करता येणार नाही याचाही विचार होण्याची गरज आहे.

Web Title: Ambabai area in Kolhapur is a barrier to double standards in development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.