तिसऱ्या माळेला अंबाबाई कामाक्षी देवी रूपात, भाविकांची दर्शनासाठी रांग
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 17, 2023 07:22 PM2023-10-17T19:22:08+5:302023-10-17T19:22:35+5:30
शारदीय नवरात्रोत्सवाचा कोल्हापुरात उत्साह
(फोटो- आदित्य वेल्हाळ)
इंदुमती सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला कोल्हापुरातील श्री अंबाबाईची कामाक्षी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. कांचीपुरम (तामिळनाडू) येथील शिवकांची आणि विष्णुकांचीच्या मध्ये कामाक्षीदेवीचे भव्य मंदिर आहे. हे देशातील 51 शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. मंगळवारी देशभरातील भाविकांना अंबाबाईच्या रुपातून कामाक्षी देवीचे दर्शन घडले.
पिता दक्ष याने शिवाचा अपमान केल्यानंतर सतीने योगाग्नीत देहत्याग केला. तेंव्हा चिडलेले श्री शिव सतीचं अचेतन शरीर खांद्यावर घेऊन फिरू करू लागले. तेव्हा इतर देवांनी भयभीत होऊन श्रीविष्णूंना विनवले. श्री विष्णूंनी सुदर्शनचक्र सोडून सतीच्या शरीराचे भाग केले. ते अवयव जिथे जिथे पडले तिथे देवीची शक्तिपीठे निर्माण झाली. सतीदेवीची नाभी जिथे पडली, तिथे कांचीपुरमचं हे कामाक्षी मंदिर उभारले आहे. आदिशक्ती श्री ललितांबिकेने चिदग्नीतून कामाक्षीचा अवतार घेवून श्रीशिवांनी दंड केलेल्या कामदेवाच्या राखेतून जन्मलेल्या राक्षसाचा भंडासुराचा वध केला. त्यानंतर कामाक्षीदेवी कन्यास्वरूप घेवून कांचीपूरम येथे स्थानापन्न झाली.
भंडासुराच्या वधाच्यावेळी चिडलेल्या कामाक्षीदेवीचे स्वरूप रौद्र होते. पण आदि शंकराचार्यांनी तिची रौद्र शक्ति तिच्यासमोर श्रीचक्र स्थापून त्यात उतरविली व देवीला शांत केले. त्यांनी 'साँदर्यलहरी' हे स्तुतीपर स्तोत्र देवीसमोर रचले. या श्रीचक्राच्या भोवतीने आठ वाग्देवींच्या मूर्ती आहेत. श्री कामाक्षीदेवी ब्रह्मासनावर पद्मासन घालून बसलेली आहे. ती
चतुर्भुज आहे. खालच्या दोन्ही हातांत इक्षुकोदंड म्हणजे उसाचं धनुष्य, आणि पाच फुलांचा पुष्पगुच्छ आहे. तर वरच्या दोन हातांत पाश आणि अंकुश ही आयुधे आहेत. देवीच्या उजव्या खांद्यावर एक पोपट आहे. श्री कामाक्षी देवी कृपाळू आहे, ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी श्रद्धा आहे. ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण. मुनीश्वर,मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडिंकर यांनी बांधली.