अंबाबाई चरणी दहा लाख भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:30 AM2017-09-27T00:30:12+5:302017-09-27T00:30:12+5:30

Ambabai Charan has 10 lakh devotees | अंबाबाई चरणी दहा लाख भाविक

अंबाबाई चरणी दहा लाख भाविक

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या गेल्या सहा दिवसांत दहा लाख भाविकांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रविवारी (दि. २४) व सोमवारी (दि. २५) दोन दिवस पडलेल्या पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली. दरम्यान, मंगळवारी १ लाख ४६ हजार ८९९ भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
गुरुवार (दि. २१) पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. त्या दिवसापासून सलग तीन दिवस रोज सव्वा लाखाच्या वर भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत होते. उत्सवकाळातील एकमेव रविवारी (दि. २४) भाविकांची उच्चांकी गर्दी होती. भाविकांच्या रांगा शिवाजी पुतळ्यापर्यंत गेल्या होत्या. मात्र त्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि भाविकांची पळापळ होऊन संख्या रोडावली.
सोमवारी (दि. २५) देखील दुपारी चार वाजल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजता पाऊस थांबल्यानंतर वातावरण पूर्ववत झाले. मात्र दोन दिवस पडलेल्या पावसाचा परिणाम भाविकांच्या गर्दीवर झाला. मंगळवारी मात्र सकाळपासून भाविकांची मंदिर परिसरात चांगली गर्दी होती. पावसानेही उघडीप दिल्याने सायंकाळीही भवानी मंडपात झालेल्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉटेल्स, यात्री निवास हाऊसफुल्ल
करवीरनिवासनी अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची कोल्हापुरात रेलचेल असते. विशेषत: उन्हाळी सुटीत, नवरात्रौत्सव, दिवाळी सुटीदरम्यान मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.
नवरात्रौत्सवापासून कोल्हापुरात लाखो परस्थ भाविकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व हॉटेल्स, यात्री निवास, धर्मशाळा, घरगुती यात्री निवासदेखील पर्यटकांनी गच्च झाले आहेत. परगावच्या गाड्यांनी बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम, सरस्वती टॉकीज,
गांधी मैदान यासारखी पार्किंगची ठिकाणेही वाहनांनी भरली असून, शहराच्या मुख्य चौकांमध्ये रहदारी खोळंबत आहे.
भाविक लुटताहेत खरेदीचा आनंद
मंदिराकडे जाणाºया सर्व बाजूंचे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने या परिसरात भाविक मोठ्या संख्येने खरेदीचा आनंद लुटत होते. किरकोळ साहित्य विक्रेते, खेळणीवाले, फेरीवाल्यांपासून ते कोल्हापूरची ओळख असलेल्या साज, ठुशी यासारख्या पारंपरिक इमिटेशन ज्वेलरी, नऊवारी साड्या, कोल्हापुरी चप्पल, गूळ, हार-गजरे, फूलवाले, ओटीसह पूजेचे साहित्य अशा सर्वच प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याने कोल्हापूरच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल सुुरू आहे.
अष्टमीला रांगेतूनच दर्शन
उद्या, गुरुवारी अष्टमी हा नवरात्रौत्सवातील सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना अन्य कोणत्याही मार्गाने अंबाबाईचे दर्शन दिले जाणार नाही. त्यामुळे सर्व भाविकांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Ambabai Charan has 10 lakh devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.