अंबाबाईचा भक्तिमय कुंकूमार्चन सोहळा, अंबा माता की जयचा अखंड गजर अन् मंत्रोच्चार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 03:48 PM2023-01-23T15:48:25+5:302023-01-23T15:48:52+5:30
हा सोहळा देवीची मूर्तीची तिच्या मूळ जागी पुनर्प्रतिष्ठापना होऊन ३०९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आला
कोल्हापूर : सकाळच्या प्रफुल्लीत प्रसन्न वातावरणात अंबा माता की जयचा अखंड गजर अन् मंत्रोच्चारात अंबाबाई मंदिराच्या पवित्र परिसरात रविवारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित सौभाग्यदायी व सौख्यदायी अंबाबाई कुंकूमार्चन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास पाच हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे भवानी मंडप अक्षरश: ओसंडून वाहत होता.
हा सोहळा देवीची मूर्तीची तिच्या मूळ जागी पुनर्प्रतिष्ठापना होऊन ३०९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आला. सर्वसामान्य महिलांना धार्मिक विधीवतरित्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने अंबाबाईच्या उपासनेचे समाधान मिळावे. या उद्देशाने भवानी मंडपात मोठा मांडव व व्यासपीठ उभारण्यात आले होते.
मध्यभागी आई अंबाबाईच्या प्रतिकृतीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. भोवतीने फुला- पानांची मनमोहक आरास होती. भक्तीमय वातावरणाने भारलेल्या या वातावरणात सकाळी साडे सात वाजता वेदमूर्ती करवीर क्षेत्रोपाध्याय सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कुंकूमार्चन उपासना पार पाडण्यात आली. कोल्हापूर ब्राम्हण पुरोहित संघाने मंत्रोच्चार केले. या सोहळ्यात महिला गुलाबी रंगाची साडी, केसात गजरा आणि पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या.
भवानी मंडपासह सर्व परिसर महिलांच्या गर्दीने भरून गेला होता. कोल्हापूरसह पुणे, मुंबई, गोवा, कोकण, कर्नाटकासह कारवार आदी भागातील महिलांनी या सहभाग घेतला. या सोहळ्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी, राजेश सुगंधी, विराज कुलकर्णी, तन्मय मेवेकरी, सुनील जोशी, संजय जोशी, आदित्य मेवेकरी, रणजित सुगंधी, प्रशांत तहसीलदार, अंकित भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.
या उपासना सोहळ्यानंतर महिलांमध्ये लकी ड्राॅ काढण्यात आला. यातील विजेत्या महिलांना एक आटाचक्की, पाच वाॅटर प्युरिफायर, पाच ऑलिव्हीया गिफ्ट, पंचवीस पैठणी साड्या अशी बक्षिसे दिली गेली.