Navratri2023: अंबाबाईचा गाभारा बंद, भाविकांनी घेतले उत्सवमूर्तीचे दर्शन; स्वच्छतेच्या कामाला वेग
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 9, 2023 12:47 PM2023-10-09T12:47:45+5:302023-10-09T12:57:42+5:30
सकाळी साडे आठच्या आरतीनंतर देवीच्या मुळ मूर्तीला इरलं पांघरण्यात आले
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या स्वच्छतेमुळे सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा गाभारा बंद ठेवल्याने दिवसभरात भाविकांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. तर, सायंकाळी ६ नंतर देवीच्या मूळ मुर्तीचे दर्शन सुरु होणार आहे.
नवरात्रौत्सव आता सहा दिवसांवर आल्याने अंबाबाई मंदिरातील स्वच्छतेच्या कामाला वेग आला आहे. एकीकडे देवीच्या नित्य व नैमित्तीक अलंकारांची स्वच्छता करण्यात आली आहे, दुसरीकडे देवीचा मूळ गाभारा आज, सोमवारी स्वच्छ करण्यात आला.
सकाळी साडे आठच्या आरतीनंतर देवीच्या मुळ मूर्तीला इरलं पांघरण्यात आले. यानिमित्ताने वर्षातून एकदा देवीला इरल्याने झाकले जाते. त्यानंतर मंदिरातील श्रीपूजक व देवस्थानच्यावतीने गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात आली होती. भाविकांची रांगही त्याच दिशेने वळविण्यात आली.