अंबाबाई मूर्ती दर्शनास खुली!
By admin | Published: August 6, 2015 01:00 AM2015-08-06T01:00:26+5:302015-08-06T01:14:10+5:30
मूर्ती संवर्धन पूर्ण : आज दुपारपासून भाविकांना दर्शन घेता येणार
कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेच्या अनुषंगाने होत असलेल्या धार्मिक विधींतर्गत अंतिम दिवशी आणि अंबाबाई मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला सहस्रकुंभाभिशेकाची गरुड मंडप येथे पूर्वतयारी करण्यात आली. आठ दिशांना व मध्यभागी वर्तुळाकार पद्धतीने एकूण सहस्र कलशांची मांडणी करून देवता स्थापन करण्यात आल्या. आज, गुरुवारी दुपारपासून भाविकांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
सायंकाळी महिला भाविकांनी हळदी-कुंकवाचा लाभ घेतला. हळदी-कुंकवाचे नियोजन श्रीपूजक मंडळाच्या महिला भगिनी ऋतुजा मुनीश्वर, सायली मुनीश्वर, मृणाल मुनीश्वर आदींनी केले. देवीची सायंकालीन आरती श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी मालोजीराजे यांनी १५ दिवस सुरू असलेल्या सर्व धार्मिक विधींची आणि मूर्ती संवर्धनासंबंधी माहिती घेतली.