अंबाबाईची मूर्ती सुस्थितीतच, काळजीचे कारण नाही; केंद्रीय पुरातत्व अधिकाऱ्यांचा निर्वाळा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 14, 2023 09:17 PM2023-03-14T21:17:35+5:302023-03-14T21:20:02+5:30
अहवालानंतर पुढील कार्यवाही
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत असून, काळजीचे कारण नाही. तातडीच्या संवर्धनाची गरज नसल्याचा निर्वाळा केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. मूर्तीच्या अवस्थेबाबत विभागाचा अहवाल व त्यातील सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दिली.
अंबाबाईच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली असून, मूर्तीचा चेहरा, कान, नाक, हनुवटीसह मूर्तीवरील संवर्धन निघाले आहे. यावरून कोल्हापुरात गदारोळ झाल्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी राज्य पुरातत्व खात्याचे सहसंचालक विलास वहाने यांनी मूर्तीची पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मूर्तीची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांना पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या दरम्यान केंद्रीय पुरातत्व खात्याचे शिवण्णाकुमार, राम निकम, राजेश्वरी तसेच कोल्हापूर पुरातत्व खात्याचे उत्तम कांबळे यांनी अर्धा तास त्यांनी मूर्तीची पाहणी केली. यावेळीयावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लेकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मूर्तीची माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही मूर्तीची स्थिती, गेल्या महिन्याभरात कोल्हापुरात झालेल्या घडामोडींची माहिती दिली. त्यांनी अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत असून, काळजीचे व तातडीने संवर्धन करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. मात्र, मूर्तीची सद्यस्थिती, संवर्धनाची गरज, काळजी याबाबत काही दिवसांत त्यांचा सविस्तर अहवाल येणार आहे. त्यानंतर मूर्ती संवर्धनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.