Ambabai Kirnotsav: पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा अंबाबाई मूर्तीस चरणस्पर्श
By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 9, 2022 07:06 PM2022-11-09T19:06:19+5:302022-11-09T19:06:50+5:30
पाच दिवसांच्या या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात पहिल्या दिवशी आज, बुधवारी मावळत्या सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला. यापुढे आणखी चार दिवस हा सोहळा होणार आहे. सूर्यकिरणांच्या प्रवासात अजूनही ताराबाई रोडवरील पाच इमारतींचा अडथळा असून बुधवारी महापालिकेचे अधिकारी किरणोत्सवाला उपस्थित राहून त्यांनी अडथळ्यांची पाहणी केली.
श्री अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. पाच दिवसांच्या या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात, दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो.
आज, सायंकाळी ५ वाजता सूर्यकिरणे महाद्वार मधून मंदिरात आली आणि ५ वाजून ४६ मिनिटांनी किरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श करून डावीकडे लुप्त झाली. दरम्यान किरणोत्सवातील अडथळ्यांची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी मंदिरात आले होते. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रा. मिलिंद कारंजकर, मंदिर अभ्यासक गणेश नेर्लीकर उपस्थित होते.