Ambabai Kirnotsav: तिसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे पोहचली अंबाबाईच्या चेहऱ्यावर
By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 11, 2022 07:34 PM2022-11-11T19:34:26+5:302022-11-11T19:36:49+5:30
आज थंडी वाढल्याने सायंकाळी पाच वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण होते.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत आली. दोन दिवसांच्या तुलनेत किरणांची तीव्रता अतिशय कमी असल्याने चेहऱ्यापर्यंत येताच ती लुप्त झाली. उद्या शनिवारी (दि.१२) किरणांचा परतीचा प्रवास सुरू होईल.
अंबाबाईच्या किरणोत्सवाचा मुख्य दिवस शुक्रवारी होता. तिसऱ्या दिवशी किरणे अंबाबाईच्या चेहऱ्यावर येतात. आज थंडी वाढल्याने सायंकाळी पाच वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण होते. मावळतीची सूर्यकिरणे ५ वाजून १ मिनिटांनी महाद्वारात आली. त्यानंतर किरणांनी ५ वाजून ४४ मिनिटांची देवीला चरणस्पर्श केला.
सायंकाळी ५ वाजून ४८ व्या मिनिटाला अंधुक झालेली किरणे हलकिशी अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत आली आणि लुप्त झाली. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, गणेश नेर्लीकर, प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते.