करवीर निवासिनी अंबाबाई कोल्लुर मुकांबिका रुपात, शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:15 PM2018-10-10T16:15:06+5:302018-10-10T16:37:26+5:30
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईचा नवरात्रौत्सव जगप्रसिद्ध आहे. देवीची रोज बांधली जाणारी पूजा हे या नवरात्रौत्सवाचे खास वैशिष्ट्य असते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता श्रीपाद मुनिश्वर यांच्या हस्ते गाभाऱ्यात घटस्थापना झाली, या विधीनंतर झालेल्या तोफेच्या सलामीने खऱ्या अर्थाने देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते देवीची शासकीय पूजा झाली.
श्री जोतिबा डोंगरावर श्री जोतिबाची विड्याच्या पानात बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा महादेव गावकर यांनी बांधली
दुपारच्या आरतीनंतर श्री अंबाबाईची कोल्लूर मुकांबिका रुपात पूजा बांधण्यात आल.ी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कोल्ल्रू गावी मुकांबिकेचे मंदिर आहे. ही देवी शंख, चक्र, वरद आणि अभय मुद्रा धारण केलेली आहे. कोल महर्षींच्या तपामुळे प्रसिद्ध झालेल्या कोल्लूर क्षेत्री मुकासुराचा वध करणारी म्हणून कोल्लुर मुकांबिका अशी या देवतेची ख्याती आहे.
कम्हासुराने घोर तप सुरू केले, त्यावेळी त्याची वाचा जावी यासाठी सरस्वतीने त्याला मुके केले म्हणून तो मुकासूर झाला. त्याच्या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून पराशक्तीचा अवतार झाला. तिने मुकासुराला मारले आणि तिला मुकांबिका नाव मिळाले. देवीसमोर स्वर्णरेखांकित शिवलिंग असून ते शिव व शक्तीचे प्रतिक आहे. ही देवी सिंहवाहिनी असून कर्नाटक, केरळ, तमिळनाडू येथे मोठा भक्तवर्ग आहे. अंबाबाईची या रुपातील पूजा अनिल गोटखिंडीकर, सचिन गोटखिंडीकर, आशिष गोटखिंडीकर यांनी बांधली.