अंबाबाई, महाकाली, बंगाली मूर्तींची भुरळ

By Admin | Published: September 20, 2016 12:41 AM2016-09-20T00:41:09+5:302016-09-20T00:41:45+5:30

तयारी नवरात्रौत्सवाची : मंडळांसाठी दुर्गेची मूर्ती घडविण्यात कुंभार बांधव व्यस्त

Ambabai, Mahakali, Bengali idols | अंबाबाई, महाकाली, बंगाली मूर्तींची भुरळ

अंबाबाई, महाकाली, बंगाली मूर्तींची भुरळ

googlenewsNext

कोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता कोल्हापूरकरांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. काही दिवसांपूर्वी गणेशाच्या मूर्तींनी गजबजून गेलेल्या कुंभारवाड्यात आता दुर्गेच्या मूर्ती घडविल्या जात आहेत. त्यात करवीरनिवासिनी अंबाबाई, महाकाली, सिंहारूढ दुर्गा व बंगाली मूर्तींची क्रेझ कायम आहे.
यंदा १ आॅक्टोबरला घटस्थापना असून, मातृसंस्कृती आणि शक्ती आराधनेच्या नवरात्रौत्सवाची तयारी आता सर्वत्र सुरू झाली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात उत्सवाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली आहे.
कोल्हापुरात दुर्गेच्या मूर्ती घडविणारे मोजकेच कुंभार कुटुंबीय आहेत. गणपतीनंतर आता त्यांचे हात दुर्गेची मूर्ती घडविण्यात गुंतले आहेत. कोल्हापुरातील शाहूपुरी, गंगावेश आणि बापट कॅम्प येथील कुंभार गल्लीमध्ये ठिकठिकाणी दुर्गेच्या मूर्ती दिसत आहेत. सिंहवाहिनी, महिषासुरमर्दिनी, महाकाली, कमळात उभी असलेली देवी अशा विविध रूपांतील मूर्ती आजवर कुंभारबांधवांकडून घडविल्या जात आहेत. या मूर्ती साधारण पाच ते सहा फुटांपर्यंत असतात. बंगाली पद्धतीच्या भव्य रूप धारण केलेल्या दुर्गामातेच्या मूर्तीही कुंभारवाड्यात दिसत आहेत.
अत्यंत बारीक कलाकुसर.. मूर्तीवर उमटणारे भावतरंग.. आणि अगदी डोळे भरून पाहत रहावे अशी वाटणारी मूर्ती, देवीची भव्य-दिव्यता आणि मूर्तीतली खास ‘बंगाली स्टाईल’ असलेल्या दुर्गामातेच्या अत्यंत नावीन्यपूर्ण आणि सुबक मूर्तीची क्रेझ कोल्हापुरात निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा कुंभारवाड्यात अशी भव्य कलाकुसर केलेली बंगाली पद्धतीची दुर्गामातेची मूर्ती घडविली जात आहे. भव्यदिव्य आणि अत्यंत सुबक पद्धतीने साकारलेल्या अशा मूर्तींना मंडळांकडून मागणी वाढली आहे. याशिवाय पाच सिंहांवर आणि राक्षसावर बसलेली ११ फूट उंचीची मूर्तीही येथे आहे. या मूर्तींचे मोल्ड पेण येथील मूर्तीवरून केले जातात.


कोल्हापुरात हजार मंडळे
दुर्गेची मूर्ती प्रतिष्ठापित करायची असेल तर कडक धार्मिक नियम, विधी पाळावे लागतात. घटस्थापना करावी लागते. कोल्हापुरातील मंडळांकडून गल्लीबोळांतही गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणारी मंडळे हजारच्या आसपास आहेत. त्यामुळे नवरात्रौत्सव सार्वजनिकरीत्या करण्याचे प्रमाण कमी आहे.


कोल्हापुरात अंबाबाई, सिंहासनारूढ दुर्गेच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातात. शिवाय सध्या बंगाली पद्धतीच्या मूर्तींचीही क्रेझ आहे.
- अशोक कुंभार

Web Title: Ambabai, Mahakali, Bengali idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.