अंबाबाई महिषासुरमर्दिनी रूपात
By admin | Published: October 22, 2015 12:45 AM2015-10-22T00:45:16+5:302015-10-22T00:49:36+5:30
अष्टमीची पूजा : दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम; भाविकांचीही मोठी गर्दी
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. कोल्हापूरची अंबाबाई ही असुरांचा संहार करणारी आणि प्रजेचे रक्षण करणारी देवता आहे. आदिशक्ती आणि दुर्गेचे एक रूप असलेल्या या देवीचा सकाळी शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महिषासुरमर्दिनी रूपात तिची पूजा बांधण्यात आली. अष्टमीला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्यासाठी अत्यंत क्रोधाने भगवान शंकराने आपल्या शरीरातून भद्रकाली, महाघोर रुद्रगण, कोटियोगिनी, असे महाशक्तिगण निर्माण केले. यामुळे अष्टमीची पूजा, उपवास, जागर आणि चंडी होमाला विशेष महत्त्व आहे. महिषासुराच्या अत्याचारांच्या व्यथा घेऊन सर्व देव शंकर व विष्णूकडे गेले. या दैवतांच्या तेजातून निर्माण झालेल्या दुर्गेने घनघोर युद्ध सुरू केले. आपल्या मायावी शक्तीने महिषासुराने अनेक रूपे घेतली. अखेर महिषाचे (रेड्याचे) रूप धारण केलेल्या या दैत्याचा देवीने वध केला; म्हणून अष्टमीला अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधली जाते. ही पूजा मयूर मुनीश्वर, मंदार मुनीश्वर, अरुण मुनीश्वर यांनी बांधली.
दिवसभरात नवदुर्गा भजनी मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, आरोही भजनी मंडळ (पुणे), भक्तिसेवा महिला भजनी मंडळ, शाहीर अनंतकुमार साळुंखे (सांगली), रुद्रांश अकॅडमी या संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
नवरात्रौत्सवात विविध सामाजिक संस्थांकडून मंदिरात सेवा अर्पण केली जाते. या कार्यात विद्यार्थीही मागे नाहीत. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या स्काऊट गाईडच्या जवळपास ४० विद्यार्थी-विद्यार्थिनी गेल्या चार दिवसांपासून मंदिर स्वच्छतेच्या कामात गुंतल्या आहेत. मंदिराचा अंतर्बाह्य परिसर स्वच्छ केला जात आहे. (प्रतिनिधी)
आज रथारूढ पूजा
आज, गुरुवारी खंडेनवमी व दसऱ्यानिमित्त अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची पालखी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी दसरा चौकाकडे आपल्या लवाजम्यानिशी निघेल. येथे शमीपूजन झाल्यानंतर सिद्धार्थनगरमार्गे ती पंचगंगा नदीघाटावर येईल. येथे पूजन झाल्यानंतर गंगावेश, पापाची तिकटी, गुजरीमार्गे पुन्हा मंदिरात येईल. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा होईल.