‘अंबामाता की जय'चा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांचा वर्षाव अन् भाविकांच्या प्रचंड गर्दीत रथोत्सव सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 11:45 AM2023-04-07T11:45:46+5:302023-04-07T11:46:17+5:30

नवीन सागवानी रथ, त्याला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि त्यावर आरूढ झालेल्या अंबामातेचं गोजिरं रूप नेत्रांत साठवण्यासाठी भाविकांची झालेली प्रचंड गर्दी

Ambabai Rathotsav ceremony was held in a devotional atmosphere | ‘अंबामाता की जय'चा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांचा वर्षाव अन् भाविकांच्या प्रचंड गर्दीत रथोत्सव सोहळा

‘अंबामाता की जय'चा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांचा वर्षाव अन् भाविकांच्या प्रचंड गर्दीत रथोत्सव सोहळा

googlenewsNext

कोल्हापूर : नवीन सागवानी रथ, त्याला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि त्यावर आरूढ झालेल्या अंबामातेचं गोजिरं रूप नेत्रांत साठवण्यासाठी भाविकांची झालेली प्रचंड गर्दी... अशा भावपूर्ण वातावरणात श्री अंबाबाईचा रथोत्सव गुरुवारी रात्री उशिरा पार पडला.

संपूर्ण रथोत्सवामध्ये सुरू असलेला ‘अंबामाता की जय..'चा गजर, रांगोळी आणि फुलांच्या घातलेल्या आकर्षक पायघड्या, भालदार, चोपदार अशा शाही लवाजम्यामध्ये करवीरनिवासिनी रथोत्सवासाठी बाहेर पडली होती. अखंडपणे उत्सवमूर्तीवर फुलांचा वर्षाव सुरू होता.

प्रतिवर्षी जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हा रथोत्सव सोहळा पार पाडतो. परंपरेनुसार रात्री सव्वानऊ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते महाद्वार येथे देवीच्या रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, देवस्थान समितीचे सचिव सुशांतकिरण बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आणि मान्यवर उपस्थित होते.

रथाचे पूजन झाल्यानंतर भाविकांच्या उत्साहाला उधाण आले. सुप्रभात बँडच्या मंगलीगीतांच्या सुरावटीमध्ये मूर्ती नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. नेत्रदीपक लेसर शो, आकर्षक आतषबाजी. रथावर केलेले एलईडीची विद्युत रोषणाई अंबामातेचं रूप आणखीनच खुलवत होती.

संध्याकाळी सहा वाजल्यापासून मिरवणुकीच्या मार्गावर फुलांचा गालिचा पसरण्याचे काम सुरू होते. अतिशय वेगाने परंतु कलात्मक रांगोळ्या काढण्यासाठी रंगावलीकार झटत होते. त्यासाठी खरी कॉनर्रकडून रस्ता बंद करण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजता रथ मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजासमोर आणून रथाची सजावट करण्यात आली. बालाजीची प्रतिकृतीही उभारण्यात आली होती.

गुजरी मित्रमंडळाने रांगोळीसाठी मुंबईहून कलाकार आणले होते; तर बालगोपाल तालमीच्या परिसरात महालक्ष्मी ढोल ताशापथकाच्या वादकांनी तलवार हाती घेतलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकाराभोवती वादन सुरू ठेवले होते. त्यामुळे शिवकाळ अवतरल्याचा भास होत होता. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गावर सेवाभावी संस्थांनी भाविकांना प्रसादवाटप, पाणी, सरबत वाटप केले. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

प्रमुख रस्त्याच्या कोपऱ्यावर अंबाबाईच्या भव्य प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे रथोत्सव मिरवणुकीची सांगता मध्यरात्री अंबाबाई मंदिरात झाली.

प्रचंड गर्दी, तरुणाईचा सहभाग

या रथोत्सवाला प्रचंड गर्दी झाली होती. देवल क्लबपासून ते गांधी मैदानापर्यंत सगळीकडे प्रचंड गर्दी दिसत होती. यामध्ये तरुण मुलामुलींची संख्याही लक्षणीय होती.

गुजरीत विलोभनीय दृश्य

गुजरीमध्ये रथ आल्यानंतर झेंडूच्या केशरी पाकळ्या रथावर उधळण्यात आल्या. याचवेळी उभारण्यात आलेल्या कमानीतून आतषबाजी सुरू झाली. एक विलोभनीय असे दृश्य यावेळी उपस्थितांनी डोळ्यांत साठवले.

Web Title: Ambabai Rathotsav ceremony was held in a devotional atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.