Ambabai Rathotsav2022: अलोट गर्दीत अंबाबाईचा रथोत्सव, सळसळता उत्साह अन् भक्तिमय वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:58 AM2022-04-18T11:58:10+5:302022-04-18T11:58:48+5:30
आकर्षक विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा निदान, अंबाबाईचा अखंड गजर, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणूक मार्गावर रेखाटलेल्या लक्षवेधी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या अशा भक्तिमय वातावरणात आणि अलोट गर्दीत रविवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव झाला.
कोल्हापूर : आकर्षक विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा निदान, अंबाबाईचा अखंड गजर, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणूक मार्गावर रेखाटलेल्या लक्षवेधी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या अशा भक्तिमय वातावरणात आणि अलोट गर्दीत रविवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव झाला. तोफेची सलामी देऊन रथोत्सवाला सुरुवात झाली. या वेळी पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, रथोत्सव पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. भक्तांनी रथोत्सवाचा मार्ग फुलून गेला होता.
दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाई रथोत्सव निघतो; पण दोन वर्षे कोरोनामुळे रथोत्सव झाला नाही. रविवारी निघणाऱ्या रथोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली. सायंकाळी पाचपासूनच रथोत्सव मार्गावर भव्य, दिव्य, आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. ठिकठिकाणी अंबाबाईची प्रतिकृती उभारण्यात आली होती.
रात्री साडेनऊ वाजता महाद्वारातून अंबाबाईचा रथोत्सव निघाला. चांदीच्या रथातून अंबाबाईची उत्सवमूर्तीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. तेथून गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, जुना राजवाडा, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटीमार्गे येऊन रथोत्सवाची सांगता महाद्वार येथे झाली. रथोत्सव पाहण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांची रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी झाली होती. अनेकजण कुटुंबातील सर्व सदस्यांसह दाखल झाले होते. पहिल्यापासून शेवटपर्यंत ते मिरवणुकीत सहभागी राहिले. गर्दीचा जनसागर पाहून पोलिसांनीही मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती.
फुलांची रांगोळी लक्षवेधी
रथोत्सवाच्या मार्गावर गुजरी आणि महाद्वार रोडला फुलांची भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती. ती लक्षवेधी ठरली. रथही आकर्षकपणे फुलांनी सजविण्यात आला होता.
सळसळता उत्साह, अन भक्तिमय वातावरण
तब्बल दोन वर्षांनंतर निघालेला भव्य अशा रथोत्सवात सळसळता उत्साह राहिला. भक्तिमय वातावरण तयार झाले होते. भाविक रथामधील अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी धडपडत होते.
सेल्फी अन व्हिडिओ
मिरवणुकीतील गर्दी आणि रथोत्सवाचा सेल्फी काढण्यात तरुणाई व्यस्त राहिली. अनेक जण व्हिडिओ करीत होते. महिला, युवती रांगोळीकडे कुतूहलाने पाहत होत्या.