अंबाबाई, भवानी मंडपाची चुकीची माहिती हटविणार; वेबसाइटबाबत प्रशासनाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:55 AM2021-03-22T03:55:06+5:302021-03-22T03:55:25+5:30
जिल्हा प्रशासनाच्या Kolhapur.gov.in या वेबसाइटवर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांबाबत जी माहिती दिली आहे. त्यामध्ये अंबाबाई देवी, भवानी मंडप आणि पन्हाळ्याबद्दल अतिशय चुकीचे संदर्भ दिले आहेत.
कोल्हापूर : देवी अंबाबाई, भवानी मंडप आणि किल्ले पन्हाळ्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर असलेली चुकीची माहिती हटवली जाणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. अशा पद्धतीची चुकीची माहिती असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर तात्काळ देसाई यांनी हा निर्णय घेतला. खासदार संभाजीराजे यांनीही या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले.
जिल्हा प्रशासनाच्या Kolhapur.gov.in या वेबसाइटवर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांबाबत जी माहिती दिली आहे. त्यामध्ये अंबाबाई देवी, भवानी मंडप आणि पन्हाळ्याबद्दल अतिशय चुकीचे संदर्भ दिले आहेत. अंबाबाईच्या मूर्तीमध्ये विशिष्ट धातू असल्यामुळे प्राचीन काळापासून मूर्तीवर प्रकाश फेकला जातो. देवीच्या हातामध्ये तलवार आहे. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरामध्ये थडगे आहे, असे हे उल्लेख आहेत. ‘लोकमत’ने रविवारच्या अंकामध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेतली.
शासनाची यंत्रणा काय करते - इंद्रजीत सावंत
अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या अंबाबाईबद्दल आणि भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिराबाबत अतिशय आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे. ही माहिती लिहिली गेल्यानंतर वेबसाइटवर टाकताना शासनाची यंत्रणा काय करत होती? असा सवाल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केला आहे.
वेबसाइटवरील चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती हटवली जाणार आहे. नवी माहिती देताना त्याविषयी इतिहास अभ्यासक आणि संशोधकांकडून खात्री करून घेतली जाईल. - दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हे तर छत्रपती घराण्याचे देवघर : संभाजीराजे
‘लोकमत’मधील वृत्ताची तातडीने दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी सविस्तर पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. यामध्ये ते म्हणतात, जुन्या राजवाड्यामध्ये तुळजाभवानीचे मंदिर नसून वस्तुत: ते छत्रपती घराण्याचे देवघर आहे. त्यास ‘श्री अंबा देवघर’ म्हटले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक, अशा ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला ‘जुना राजवाडा’ या वास्तूचा इतिहास शासकीय संकेतस्थळावर चुकीच्या पद्धतीने मांडला जाणे क्लेशदायक आहे.