अंबाबाई शालू लिलाव पाच वर्षांच्या सरासरीवर
By admin | Published: February 5, 2016 12:49 AM2016-02-05T00:49:11+5:302016-02-05T00:50:55+5:30
देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस नवरात्रौत्सवात तिरुपती-बालाजी देवस्थानकडून आलेल्या मानाचा शालूचा लिलाव हा मागील पाच वर्षांच्या लिलावातील आलेल्या बोलीच्या सरासरीवर व बाजारभावातील सद्य:स्थितीच्या दरावर काढण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
प्रतिवर्षाप्रमाणे करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस आंध्र प्रदेशातील तिरुपती-बालाजी देवस्थानकडून मानाचा शालू देण्यात आला होता. यंदा या शालूचा लिलावही नवरात्रौत्सवानंतर काही महिन्यांनी ठेवण्यात आला होता. मात्र, अपेक्षित बोलीच चार लाखांच्या पुढे ठेवण्यात आल्याने सहभागींनी लिलावात बोली न लावताच माघार घेतली. त्यामुळे हा लिलाव रद्द झाला. हा लिलाव आता पाच वर्षांतील लिलावात आलेल्या किमतीच्या सरासरीवर व बाजारभावाचा ताळमेळ घालून जी कमी किंमत आहे त्यावर लिलावाच्या बोलीची सुरुवातीची रक्कम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय लाडू प्रसादाचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्याकरिता नवीन निविदा प्रक्रियेस प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आहे त्या ठेकेदारास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. यावेळी अन्य कार्यालयीन विषयही बैठकीत झाले.
यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे संचालक दादा परब, प्रमोद पाटील, राजेंद्र आण्णा देशमुख, भीमगौडा पाटील, संगीता खाडे, सचिव शुभांगी साठे, सहायक सचिव शिवाजी साळवी, आदी उपस्थित होते.