अंबाबाई मूर्तीचे होणार ३१ आॅगस्टपर्यंत संवर्धन

By admin | Published: June 10, 2015 12:53 AM2015-06-10T00:53:21+5:302015-06-10T00:56:23+5:30

अधिकाऱ्यांची आज पाहणी : रासायनिक संवर्धन प्रक्रियेला केंद्रीय पुरातत्त्व खात्याची मान्यता

Ambabai statue will be promoted till 31st August | अंबाबाई मूर्तीचे होणार ३१ आॅगस्टपर्यंत संवर्धन

अंबाबाई मूर्तीचे होणार ३१ आॅगस्टपर्यंत संवर्धन

Next

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (केमिकल कॉन्झर्वेशन) केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून आज, बुधवारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मूर्तीची पाहणी करणार आहेत. ३१ आॅगस्टच्या आत मूर्तीवर रासायनिक संवर्धन होणार आहे.
अंबाबाईच्या मूर्तीवर वज्रलेप करावा की करू नये, या विषयावर १४ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता. श्रीपूजकांच्या पुढाकाराने हा खटला वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग होऊन काही महिन्यांपूर्वीच वादी-प्रतिवादींचे केमिकल कॉन्झर्वेशनवर एकमत होऊन हा विषय निकाली निघाला. त्यानंतर केमिकल कॉन्झर्वेशनचा हा प्रस्ताव केंद्राकडे गेला. मात्र, त्यावर केंद्राकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद न मिळाल्याने हा विषय रखडला होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. यानिमित्ताने कोल्हापुरात आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना श्रीपूजक मंडळाने मूर्तीच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. तसेच केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून ही संवर्धनाची प्रक्रिया केली जावी, या मागणीचे निवेदन दिले. शहा यांनी तातडीने हा विषय मार्गी लावत औरंगाबाद येथील केंद्रीय पुरातत्त्व खात्याला मूर्तीवर केमिकल कॉन्झर्वेशन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकारी सिंग यांनी दूरध्वनीवरून श्रीपूजक मंडळाशी संपर्क साधून या आदेशाची माहिती दिली.
न्यायालयीन आदेशानुसार ३१ आॅगस्टच्या आत अंबाबाई मूर्तीवर केमिकल कॉन्झर्वेशन करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी आज केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करणार आहेत. त्यांचा, मूर्तीची सद्य:स्थिती, करण्यात येणारी रासायनिक प्रक्रिया, त्यासाठी येणारा खर्च, लागणारा कालावधी, याबाबतचा अहवाल येईल. केमिकल कॉन्झर्वेशनसाठी लागणारा खर्च हा देवस्थान समितीने करायचा व धार्मिक विधींसाठी येणारा खर्च श्रीपूजकांनी करायचा, असे निकालाच्या नोटिफिकेशनमध्ये नमूद आहे. त्यानुसार हा खर्च विभागला जाईल.

Web Title: Ambabai statue will be promoted till 31st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.