फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजले अंबाबाई मंदिर; नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 12:13 PM2024-10-03T12:13:27+5:302024-10-03T12:13:52+5:30
सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली
कोल्हापूर : दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवणारी आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवार (दि.३) पासून मंगलमयी वातावरणात प्रारंभ होत आहे. यानिमित्त रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीने आणि विद्युत रोषणाईने मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून देवीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या भाविकांनी अंबा माता की जय, अंबाबाईच्या नावानं चांगभलं, आई राजा उदो उदो करत देवीच्या जागराला सुरुवात केली. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली.
देशातील ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता असलेल्या श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे देशभरातील भाविकांसाठीचे श्रद्धास्थान. गुरुवारी(दि.३) सकाळी साडेआठ वाजता श्रीपूजकांचे मूळ घराणे मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना झाली. त्यानंतर देवीचा शासकीय अभिषेक होईल. दुपारी साडेबाराच्या आरतीनंतर देवीची सालंकृत रुपातील पूजा बांधली जाईल. रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा होईल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयाच्या दारात सकाळपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.
फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजले मंदिर
पुण्याच्या हिडदुगी यांच्या वतीने अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडू फुलांच्या माळा, देशीविदेशी जातींचा फुलोत्सव येथे रंगला आहे. यासह मंदिराची शिखरे, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमानी, दगडी भिंती यावरील आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईने मंदिर अधिकच सुंदर झाले आहे.
शेतकरी बझारमध्ये दर्शन मंडप सुरू..
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने बुधवारी शेतकरी बझारची इमारत ताब्यात घेतली. इमारतीची स्वच्छता झाल्यानंतर सायंकाळी बॅरिकेड्स लावून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या. भाविकांना अंबाबाईचे थेट दर्शन व्हावे यासाठी मोठा एलईडी स्क्रीन बसविण्यात आला आहे. परिसरावर सीसीटीव्हींचा वॉच असेल.