अंबाबाई मंदिराचा विकास आॅक्टोबरपासून

By admin | Published: July 31, 2016 12:52 AM2016-07-31T00:52:24+5:302016-07-31T00:52:24+5:30

चंद्रकांतदादा पाटील : पहिल्या टप्प्यातील आराखड्याला मंजुरी; स्कायवॉक, टेंबलाई भक्त निवास वगळले

Ambabai temple development from October | अंबाबाई मंदिराचा विकास आॅक्टोबरपासून

अंबाबाई मंदिराचा विकास आॅक्टोबरपासून

Next

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या ७२ कोटींच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्याला जिल्हा पर्यटन समितीच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आली. स्काय वॉक आणि टेंबलाईवाडी येथील भक्त निवास वगळून हा आराखडा शासनाच्या मंजुरीसाठी तातडीने पाठविण्यात येणार असून, एक आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात करण्यात येणार आहे. मेपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम संपविण्याचे नियोजन केले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले.
नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखडा बैठकीत सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराबाई सभागृहात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापौर अश्विनी रामाणे, आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे उपस्थित होते. कोणतेही वादविवाद न होता अंबाबाई मंदिर आराखडयातील विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत. आराखड्याला शासनाकडून तातडीने मंजुरी घेण्यात येणार असून पावसाळा संपण्यापूर्वी निविदा, वर्क आॅर्डर या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जाणार आहेत. आॅक्टोबर मध्ये प्रत्यक्ष विकासकामे व बांधकामांना सुरुवात होईल आणि मे २०१७ पर्यंत पहिल्या टप्प्यातील विकासकामे संपविण्याचे नियोजन असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
-----------------
व्हीनस कॉर्नरला भक्त निवास
पहिल्या टप्प्यात केवळ दर्शन मंडप, पार्किंग आणि भक्त निवासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नव्या नियोजनानुसार भक्त निवास टेंबलाईवाडीऐवजी व्हीनस कॉर्नर येथे उभारण्यात येणार आहे. येथे तीन मजली पार्किंग व्यवस्था असेल, ज्यात ३६० चारचाकी बसतील. प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, खास महिला व लहान मुलांसाठी विश्रांतीगृह असेल. त्यावर ३०० खोल्यांचे भक्त निवास असेल. येथून मंदिरापर्यंत स्वतंत्र बससेवा असेल.
-------------
दर्शन मंडपावरून तीव्र मतभेद
दर्शन मंडपावरून हेरिटेज समितीच्या सदस्या वास्तुविशारद अमरजा निंबाळकर आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद झाले. अंबाबाई मंदिराचा समावेश राज्य संरक्षित स्मारकामध्ये करण्यात आला असून त्याच्या नियमानुसार मंदिराच्या बा' परिसरात दर्शन मंडप उभारता येणार नाही; शिवाय ते मंदिराच्या मूळ वास्तुसौंदर्याला बाधक ठरेल. कोणत्याही पुरातन वास्तूचा बा' परिसर अधिकाधिक मोकळा असला पाहिजे. खुल्या जागा बंद करणे चुकीचे ठरेल, असे मत अमरजा निंबाळकर यांनी मांडले. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत हा नियम मंदिराला लागू आहे का, असा प्रश्न पुरातत्त्व अधिकारी विलास वहाने यांना विचारला. त्यावर वहाने यांनी आत्ता तरी तसा नियम लागू नाही असे सांगितले. दोन जबाबदार घटकांकडून वेगवेगळी मते आल्याने हे मतभेद झाले.
-------------
-----------
सोलर लाईट
खासदार धनंजय महाडिक यांनी दर्शन मंडप, भक्त निवास सारख्या वास्तू भरपूर प्रकाश आणि खेळती हवा राहील अशाच पद्धतीने बांधाव्यात. दिवसा तेथे लाईट व पंख्यांची गरज भासू नये अशी सूचना मांडली. त्यावर पालकमंत्र्यांनी सर्व नव्या वास्तूंमध्ये सोलर लाईट सिस्टीम बसवण्यात यावी, तसेच देखभाल खर्च कमीत कमी व्हावा अशा रीतीने वास्तू उभाराव्यात असे सांगितले.
---------------
पार्किंग मैदानावरच
आराखड्यानुसार बिंदू चौकात तीन मजली पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र पहिल्या टप्प्यात येथे फक्त मैदानावरच पार्किंगची सोय केली जाणार आहे. आराखड्याचे काम सुरू असेपर्यंत बिंदू चौक सबजेल कळंब्याला हलवला गेल्यास येथे बहुमजली पार्किंग उभारले जाईल; अन्यथा दुसऱ्या टप्प्यात याचा विचार केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
-----------------
मुखदर्शन रांग दक्षिण दरवाजातून
दक्षिण दरवाजासमोरील जागेत तीन मजली दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. तीनही मजल्यांवर स्वच्छतागृह, लॉकर्स, चप्पल स्टॅँड असेल. ही गाभारा दर्शनाची रांग पूर्व दरवाजापर्यंत जाईल. येथूनच व्हीआयपींना प्रवेश असेल. मुखदर्शनाची रांग दक्षिण दरवाजातून मंदिरात जाईल आणि महाद्वारामधून भाविकांना बाहेर जाता येईल. उत्तर दरवाजा आपत्कालीन व्यवस्थेसाठी असेल.
-----------------------
दर्शन मंडपासाठीचा पर्याय
अमरजा निंबाळकर यांनी नव्याने दर्शन मंडप बांधण्यास विरोध करताना त्यासाठी शेतकरी संघा शेजारील अलंकार हॉटेल परिसराचा पर्याय मांडला. तिथे पूर्वी ऐतिहासिक कमान होती. ही कमान जुना राजवाडा पोलिस ठाणे आणि शेतकरी बझारशेजारील इमारतीला जोडणारी होती. ती पुढे विकास करताना काढण्यात आली. येथे पुन्हा ही कमान उभारून शेतकरी बझारशेजारच्या परिसरातच दर्शन मंडप उभारावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Ambabai temple development from October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.