कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे तीन टप्पे करा, मुख्य सचिवांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:35 IST2025-04-23T17:34:39+5:302025-04-23T17:35:09+5:30
किरणोत्सवाचा मार्ग मोकळा करा

संग्रहित छाया
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे तीन टप्पे करा, पहिल्या टप्प्यात फक्त मंदिर व मंदिराशी निगडित विकासकामांचा समावेश करा, अशी सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंगळवारी केली. मुख्य सचिवांच्या कार्यालयाचे इतिवृत्त येताच पुढील १० दिवसांत बदलांसह सुधारित आराखडा पुन्हा त्यांना सादर केला जाणार आहे.
अंबाबाई मंदिराचा १४०० कोटींचा व जोतिबा मंदिराचा १७०० कोटींचा आराखडा मंगळवारी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आला. मंत्रालयातून जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आयरेकर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी सौनिक यांनी अंबाबाई मंदिराचा एकच आराखडा अवाढव्य झाला आहे. तसे न करता आहे त्याच आराखड्याचे तीन टप्पे करा. पहिल्या टप्प्यात मंदिर परिसर सुधारणा, भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी आवश्यक असलेल्या मिळकतींचे संपादन करा. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे नियोजन करा, अशी सूचना केली. सुधारणांसह आराखडा पुढील १० दिवसांत पुन्हा मुख्य सचिवांना सादर होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीकडे अंतिम मंजुरीसाठी जाण्याची शक्यता आहे. यावेळी जोतिबा आराखड्यावरदेखील चर्चा झाली. विकास आराखड्याच्या विषयावर तसेच प्राधिकरण स्थापन करण्यावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
किरणोत्सवाचा मार्ग मोकळा करा
यावेळी सौनिक यांनी आराखड्यांतर्गत किरणोत्सवाचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले. किरणोत्सवातील सर्व अडथळे काढून टाका. भविष्यात तेथे इमारती होणार नाहीत याची काळजी घ्या, बाधितांना नुकसान भरपाई, टीडीआर देण्यासंबंधी महापालिकेने कार्यवाही करावी ही महत्त्वाची सूचना केली.