कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अंबाबाई मंदिर प्रशासन सतर्क, कर्मचाऱ्यांना केल्या मास्क वापरण्याच्या सूचना
By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 22, 2022 06:51 PM2022-12-22T18:51:39+5:302022-12-22T19:00:04+5:30
भाविक आणि कर्मचारी दोघांच्याही सुरक्षेसाठी हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, पण..
कोल्हापूर : देशभरातून येणाऱ्या भाविकांकडून कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. भाविक आणि कर्मचारी दोघांच्याही सुरक्षेसाठी हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, पण सक्ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाल्यानंतर भारतातही आता रुग्ण आढळू लागले आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येतात. त्यांच्या संपर्कात कर्मचारी आले की त्यांना आणि त्यांच्याकडून पुन्हा भाविकांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्य किंवा केंद्र शासनाने अजून मास्कची सक्ती केलेली नसल्याने भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक नाही, असे नाईकवाडे यांनी सांगितले.
चीनमध्ये Omicron चा sub-variant BF.7 ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले ४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.