अंबाबाई मंदिर सुरक्षेबाबत दक्ष रहा
By admin | Published: June 10, 2015 12:20 AM2015-06-10T00:20:07+5:302015-06-10T00:27:21+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : फेरीवाल्यांचा निर्णय संयुक्त पाहणीनंतर घेणार
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात. पोलीस प्रशासन, देवस्थान समिती यांनी सुरक्षेच्या बाबतीत दक्ष रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केल्या. फेरीवाल्यांचे प्रश्न, तसेच पार्किंग सुविधासंदर्भात संयुक्त पाहणीनंतर निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले. जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी मंगळवारी दुपारी अंबाबाई मंदिर सुरक्षिततेचा आढावा, तसेच पुढील काळात करायच्या उपाययोजनांबाबत बैठक झाली. या बैठकीस मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, वाहतूक शाखेचे निरीक्षक आर. आर. पाटील, मनपा नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ‘देवस्थान’च्या सचिव शुभांगी साठे, फेरीवाला कृती समितीचे दिलीप पोवार, अशोकराव भंडारे, नंदकुमार वळंजू, रमाकांत उरसाल, सुरेंद्र शहा, भाऊसाहेब गणपुले, समीर नदाफ, आदी उपस्थित होते.
मंदिराच्या सुरक्षेबाबत सीसीटीव्ही यंत्रणा अपडेट करण्याच्या, तसेच आवश्यक तेथे जादा कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे डॉ. सैनी यांनी सांगितले. येथील मान्यताप्राप्त पुजाऱ्यांना नवीन ओळखपत्रे देण्याचे बैठकीत ठरले. (प्रतिनिधी)
संयुक्त पाहणीचा निर्णय
मंदिराभोवतालचे फूलविक्रेते, फेरीवाले यांना २०० मीटर अंतरापर्यंत हटविता येईल का? यावर चर्चा झाली. परंतु, चर्चेनंतर या विक्रेत्यांना आहे तेथे थोडे अधिक अंतरावर त्यांची कशी सोय करता येईल, हे ठरविण्यासाठी संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले. मंदिराभोवती पार्किंगसाठी अन्य कोणत्या करता येतील, याची पाहणी करण्याचेही यावेळी ठरले.
खासगी सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण
अंबाबाई मंदिरात पोलिसांबरोबरच देवस्थान समितीचे खासगी सुरक्षारक्षक बंदोबस्तास असतात. परंतु, त्यांना विशेष असे प्रशिक्षण देण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रशिक्षण त्यांना देण्यात यावे, अशी सुचना डॉ. सैनी यांनी केली.