अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:42 PM2020-12-19T19:42:25+5:302020-12-19T19:44:51+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur news- करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या यंत्रणेचे शनिवारी लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या यंत्रणेमुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि त्याच्या वैशिष्ट्यांसह येणार आहे. ज्या परिसरासाठी सूचना द्यायची आहे, त्या ठिकाणीच आवाज ऐकू येणार असल्याने मंदिराचे मांगल्य-पावित्र्य, शांतता जपली जाणार आहे.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या यंत्रणेचे शनिवारी लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या यंत्रणेमुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि त्याच्या वैशिष्ट्यांसह येणार आहे. ज्या परिसरासाठी सूचना द्यायची आहे, त्या ठिकाणीच आवाज ऐकू येणार असल्याने मंदिराचे मांगल्य-पावित्र्य, शांतता जपली जाणार आहे.
खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून दीड वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने हा निधी अंबाबाई मंदिरासाठी दिला होता. मंदिरातील गरुड मंडपात झालेल्या सोहळ्यात या यंत्रणेचे लोकार्पण तसेच देवस्थान समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते.
यावेळी यंत्रणेचे काम केलेल्या कॉमटेक टेलीसोल्युशन कंपनीचे संचालक नवीन हालगेकर, प्रोजेक्ट मॅनेजर एडवर्ड डिसुझा, कन्सलटंट शेखर निरगुडकर, अमरजा निंबाळकर, राहुल जगताप व अभिजित पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विजय पोवार यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.