अंबाबाईचा किरणोत्सव: सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणांखाली कटांजनपर्यंत पोहोचली, अडथळा नसल्याने तीव्रता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:47 PM2024-11-07T12:47:18+5:302024-11-07T12:48:23+5:30
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आवारातील गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चांगलीच वाढली आहे. देवीचा किरणोत्सव ...
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आवारातील गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चांगलीच वाढली आहे. देवीचा किरणोत्सव शुक्रवारपासून (दि. ८) सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या चाचणीत सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणांखाली असलेल्या कटांजनपर्यंत पोहोचली होती. आज गुरुवारी किरणे चरणस्पर्श करतील, अशी शक्यता आहे.
मंदिर स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत दक्षिणायन आणि ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान उत्तरायण किरणोत्सव हाेतो. त्या निमित्ताने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने किरणांच्या तीव्रतेची चाचणी घेण्यात आली.
मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून गरुड मंडपात येऊन पुढे अंबाबाईच्या गाभाऱ्यात जातात. गरुड मंडप धोकादायक झाल्याने तो उतरविण्यात आला आहे. गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने सूर्यकिरणांची तीव्रता अधिक वाढली असून, ती बुधवारी पूर्णक्षमतेने गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. किरणे बुधवारी अंबाबाई मूर्तीच्या चरणांखालील कटांजनपर्यंत पोहोचून लुप्त झाली.