अंबाबाई मंदिराला लागते वर्षाला साडेनऊशे किलो कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:25 PM2020-02-27T16:25:15+5:302020-02-27T16:28:39+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला जातो. नवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी असते.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला जातो. नवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी असते.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी देवता असलेल्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षाला ५० ते ६० लाख भाविक येतात. देवीची महती सर्वदूर पसरल्याने या भाविकसंख्येत वाढ होत आहे. त्यात आॅनलाईन दर्शनसुविधेमुळे त्यात देशविदेशांतील भाविकांचीही भर पडली आहे.
स्त्रीदैवत म्हटले की कुंकवाचे महत्त्व ओघाने आलेच. त्यात आदिशक्ती अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधींचे वेगळेपण आहे. अंबाबाईचे मंदिर पहाटे साडेचार वाजता उघडते. तेव्हापासून देवीची काकड आरती, सकाळी सहा, साडेआठ आणि ११ वाजता असे तीन वेळचे अभिषेक, दुपारची आरती, त्यानंतरची सालंकृत पूजा, शेजारती असे नित्य व नैमित्तिक विधी पार पडतात. रात्री १० वाजता गाभारा बंद होतो. पालखी सोहळा असेल त्या दिवशी थोडा उशीर होतो. याशिवाय सण, उत्सव, समारंभाच्या निमित्ताने विशेष पूजा बांधल्या जातात. नवरात्रौत्सवाच्या काळात अभिषेकांची संख्या दुपटीने वाढते.
वरील सर्व धार्मिक कृत्यांसाठी कुंकू मोठ्या प्रमाणात लागते. ते हळदीपासून बनविलेले व शुद्ध प्रतीचे असावे लागते. त्यासाठी नुकतीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निविदा काढली आहे. ती दोन वर्षांसाठी देण्यात येणार असून, त्यासाठी तीनजणांनी अर्ज केला आहे.
वर्षभर लागणारे कुंकू
- दैनंदिन धार्मिक विधी : ३५० किलो
- नवरात्रौत्सवात लागणारे कुंकू : ७० किलो
- वर्षभरातील कुंकुमार्चन विधी : ४० किलो
- ७०० महिलांचा सामुदायिक कुंकुमार्चन विधी : ७० किलो.
प्रसाद पाकिटे ८८ हजार
अनेक परस्थ भाविक देवस्थान समितीकडे शाश्वत पूजेसाठीची पावती करून जातात. अशा भाविकांना समितीच्या वतीने प्रसादाचे पाकीट पोस्टाने अथवा कुरिअरने पाठविले जाते. त्यात हळदी-कुंकू, साखर आणि फुटाण्यांचा समावेश असतो. याशिवाय अभिषेकासह विविध धार्मिक विधींनंतर भाविकांना हे प्रसाद पाकीट दिले जाते. वर्षाला ८८ हजारांहून अधिक पाकिटे लागतात. त्यांपैकी केवळ नवरात्रौत्सवातील पाकिटांची संख्या ११ हजार आहे.
साडेसातशे लिटर दूध, दोनशे लिटर दही
देवीच्या पंचामृत अभिषेकासाठी दूध व दहीदेखील मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी महिन्याला किमान ६२ लिटर दूध आणि १६ लिटर दही वापरले जाते. अशा रीतीने वर्षाला साडेसातशे लिटर दूध व दोनशे लिटर दही लागते; तर साखर ५० किलो, मध चार किलो लागतो.
तीन हजार केळी
समितीच्या अखत्यारीत असलेल्या ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर व बिनखांबी गणेश मंदिरासाठी केळी मागविली जातात. अंगारकी संकष्टी असेल त्यावेळी दोन हजार केळी; तर दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीसाठी एक हजार केळी वापरली जातात.