Kolhapur: शाही सोहळ्याने झाली अंबाबाई-त्र्यंबोली देवीची भेट; त्र्यंबोली यात्रेत कोहळ्यासाठी पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 03:41 PM2024-10-09T15:41:02+5:302024-10-09T15:42:01+5:30
कोल्हापूर : रांगोळी फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, पारंपरिक वाजंत्री, कुमारिकेचे पूजन, कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर अशा ...
कोल्हापूर : रांगोळी फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, पारंपरिक वाजंत्री, कुमारिकेचे पूजन, कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर अशा पारंपरिक आणि शाही साेहळ्याने मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई व प्रिय सखी त्र्यंबोलीची भेट झाली. ललिता पंचमीनिमित्त झालेल्या या यात्रेत कोहळ्यासाठीची पळापळ वगळता यात्रा शांततेत व उत्साहात पार पडली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी कोल्हापूरकरांकडून स्वागत स्वीकारत अंबाबाईची पालखी सायंकाळी ५ नंतर मंदिरात परतली.
अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीला अंबाबाई आपल्या शाही लव्याजम्यानिशी आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. मंगळवारी सकाळी दहा वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची पालखी त्र्यंबोलीच्या दिशेने निघाली. बिंदू चौक, उमा टॉकीज चौक, शाहू मिल चौक, टाकाळामार्गे दुपारी पाऊण वाजता अंबाबाई व जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीच्या पालख्या मंदिराच्या आवारात आल्या. येथे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शहाजीराजे, यशराजे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह मानकरी उपस्थित होते.
संभाजीराजे यांच्या हस्ते गुरव घराण्यातील सागरिका गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. अंबाबाई-त्र्यंबोली देवीच्या भेटीचा साेहळा झाला. आरती झाली. त्यानंतर कुमारिकेच्या हस्ते कोहळा भेदनाचा विधी पार पडला. त्यानंतर कोहळा घेण्यासाठी काही नागरिकांची झुंबड उडाली. कोहळ्यासाठीची पळापळ वगळता यात्रा शांतेत पार पडली. त्यानंतर तुळजाभवानी देवीची पालखी जुना राजवाड्यासाठी मार्गस्थ झाली. अंबाबाईची पालखी मात्र मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून आरती, पूजन, स्वागत साेहळे स्वीकारत सायंकाळी पाचनंतर मंदिरात परतली.
अंबाबाईची प्रतिकृती,.. फुले रांगोळ्यांच्या पायघड्या..
मंदिर प्रदक्षिणा, नगरप्रदक्षिणेचा मार्ग वगळता वर्षातून एकदा फक्त ललिता पंचमीला अंबाबाईची उत्सवमूर्ती मंदिराचा परीघ सोडून भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी बाहेर पडते. कोल्हापूरच्या प्रमुख मार्गांवरून जाते. त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी तिची प्रतिकृती उभारली होती. स्थानिक मंडळांनी स्वागताचे मोठे डिजिटल, मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमवर भक्तीगीते लावली होती. मार्गावर फुलांच्या व रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. महिलांनी देवीची आरती केली.
प्रसाद, पाणी, सरबत वाटप
पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक नागरिक व मंडळांच्या वतीने लव्याजम्यासाठी खिचडीसह, पिण्याचे पाणी, सरबत अशा पदार्थांचे वाटप करण्यात आले.