अंबाबाई वैष्णवी मातेच्या रूपात
By Admin | Published: October 6, 2016 12:20 AM2016-10-06T00:20:01+5:302016-10-06T01:14:22+5:30
श्री अंबाबाईच्या श्लोकात श्री देवीचे वाहन गरुड दर्शविण्यात आले आहे. देवीच्या या स्वरूपाचा कोल्हासुरास भय निर्माण करणारी देवी असा कोल्हासुराच्या इतिहासाशी संबंध दर्शविला आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (बुधवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गरुडवाहिनी वैष्णवी मातेच्या रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री देवीची पालखी हेलिकॉप्टरच्या आकारात काढण्यात आली; तर जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची पूजा सिंहवाहिनी रूपात बांधण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला सकाळी देवीची काकडआरती व अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर देवीची गरुडवाहिनी वैष्णवीमातेच्या रूपात पूजा बांधण्यात आली. श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या प्रधान नवशक्तींमधील श्री वैष्णवीदेवी एक शक्ती आहे. रक्तबीज किंवा महिषासुरादिकांच्या वधासाठी सर्व देवांच्या तेजसारांसमधून श्रीमहादेवी प्रकटली. श्री अंबाबाईच्या श्लोकात श्री देवीचे वाहन गरुड दर्शविण्यात आले आहे. देवीच्या या स्वरूपाचा कोल्हासुरास भय निर्माण करणारी देवी असा कोल्हासुराच्या इतिहासाशी संबंध दर्शविला आहे. वैष्णवीदेवी चार हातांची असून, तिने हातांत शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले आहे. ही देवी एकमुखी असते. आजची पूजा सचिन ठाणेकर, नीलेश ठाणेकर, अमित दिवाण यांनी बांधली.
दिवसभरात रामगोंडा परमात्मा भजनी मंडळ, संतशिरोमणी नामदेव महाराज महिला भजनी मंडळ, दत्त महिला भजनी मंडळ, अर्चना खजानिस यांची भावगीते व भक्तिगीते, नर्तना स्कूल आॅफ डान्सचे भरतनाट्यम् व हास्यगंध कार्यक्रम, प्रतिभा थोरात यांचे गायन सादर झाले. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी हेलिकॉप्टरच्या आकारात
काढण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, प्रांताधिकारी समीर शिंगटे, धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पोवार, देवस्थान समितीचे वकील अॅड. ए. पी. पोवार यांनी पालखीपूजन केले.
त्र्यंबोली यात्रा आज
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा व कोहळा छेदन विधीची त्र्यंबोली यात्रा आज, गुरुवारी होणार आहे. यानिमित्त त्र्यंबोली टेकडीवर जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांच्या सोयीसाठी बससेवेसह वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. आज सकाळी १० पर्यंत मंदिरातील धार्मिक विधी पार पाडले जातील. तोफेची सलामी दिल्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्र्ती पालखीतून त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघणार आहे. त्याचवेळी जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानी देवीची व गुरु महाराजांची पालखी देखील त्र्यंबोलीसाठी प्रस्थान करेल. त्र्यंबोली मंदिर येथे दुपारी बारा वाजता गुरव घराण्यातील कुमारिकेच्या हस्ते कोल्हासुराचे प्रतीक असलेला कोहळा फोडण्यात येणार असून, यावेळी श्रीमंत छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागतील. अंबाबाईची पालखी दुपारी ४ वाजता पुन्हा मंदिरात येईल. रात्री पुन्हा पालखी सोहळा होणार आहे.
अन्नछत्र ट्रस्टकडून मोफत बससेवा
त्र्यंबोली यात्रेनिमित्त आज श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे मोफत बससेवा पुरविण्यात येणार आहे. बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर व परत त्र्यंबोली मंदिर ते बिंदू चौक अशी ही बससेवा सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोफत बससेवेचे यंदाचे चौथे वर्ष आहे.
अंबाबाई मंदिर व बाह्य परिसरात उभारण्यात आलेल्या वैद्यकीय केंद्राचा गेल्या पाच दिवसांत आठशेहून अधिक भाविकांनी लाभ घेतला.