‘अंबाबाई’चे ८० कोटी फ्लेक्सवरच! : मंडपाचे काय झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:43 AM2019-05-09T00:43:59+5:302019-05-09T00:44:30+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी जाहीर करण्यात आलेला ८० कोटींचा निधी फ्लेक्सवरच राहिला आहे. मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर जणू काही मंदिराचा विकासच झाला, या आशयाचे मोठे डिजिटल फलक शहरात लागले होते; पण त्यालाही वर्ष लोटल्यानंतर निवडणूक काळात केवळ सात कोटींचा निधी मंदिरासाठी देण्यात आला आहे.
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी जाहीर करण्यात आलेला ८० कोटींचा निधी फ्लेक्सवरच राहिला आहे. मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर जणू काही मंदिराचा विकासच झाला, या आशयाचे मोठे डिजिटल फलक शहरात लागले होते; पण त्यालाही वर्ष लोटल्यानंतर निवडणूक काळात केवळ सात कोटींचा निधी मंदिरासाठी देण्यात आला आहे.
श्री अंबाबाई मंदिराच्या विकासाची चर्चा सुरू झाल्यापासून गेल्या आठ वर्षांत आराखड्यांवर आराखडे, वर्ग झालेला दहा कोटींचा निधी परत जाणे, छाननी, बदल, दुरुस्त्या एवढ्याच गोष्टी झाल्या आहेत. त्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृह आणि कोल्हापूर चित्रनगरीचा विकास झपाट्याने करण्यात आला; पण अंबाबाईच्या नशिबी शासनाच्या लालफितीचा कारभार आला. चर्चांवर चर्चा झाल्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांनी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्याआधीच पालकमंत्र्यांनी मंदिरासाठी ७७ कोटींचा निधी राखीव ठेवल्याचे टिष्ट्वट केले होते. या मंजुरीनंतर शहरात ठिकठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक लागले. चौकाचौकांत उभारलेल्या या फ्लेक्सवर अंबाबाई मंदिरासाठी ८० कोटींचा निधी आणल्याची नोंद होती. हे फ्लेक्स पाहिल्यानंतर आता विकासकामांना सुरुवात झालीच असे काहीसे कोल्हापूरकरांना भासविण्यात आले; पण प्रत्यक्षात दीड वर्ष झाले विकासाच्या नावाखाली मंदिर परिसरातील एक वीटही हललेली नाही.
महापालिकेकडे सध्या सात कोटींचा निधी वर्ग झाला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर विकासकामांना सुरुवात करायचे त्यांचे नियोजन असले तरी तेव्हा पावसाळा सुरू होतो. त्यामुळे या कालावधीत काहीच करता येणार नाही. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर विकास आराखड्याचे काम हनुमंताच्या शेपटीप्रमाणेच वाढत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
निकालानंतर विकासकामांना सुरुवात
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विकास आराखड्यासाठी सात कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे आता मंदिर विकास आराखड्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी २३ मे रोजी लोकसभेचा निकाल लागल्याशिवाय आणि आचारसंहिता संपल्याशिवाय विकासकामांचा नारळ फोडता येणार नाही. त्यामुळे आता ही प्रक्रिया जूनच्या दरम्यानच सुरू होईल.
पर्यायी दर्शन : मंडपाचे काय झाले?
या विकास आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यापीठ हायस्कूलच्या गेटसमोरील जागेत दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. मात्र, ही मंदिर बाह्य परिसरातील एकमेव मोकळी जागा आहे. नवरात्रौत्सवादरम्यान या मोकळ्या जागेमुळे गर्दीचे नियंत्रण व व्यवस्थापन करणे सोपे जाते. हेरिटेज नियमांनुसार येथे नवीन वास्तू बांधणे चुकीचे आहे. शिवाय या नव्या वास्तूला आर्किटेक्ट संस्थेचा व कोल्हापूरकरांचा विरोध आहे. त्याऐवजी वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी महाराजांच्या अखत्यारीतील फरासखान्याचा पर्याय मांडला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या परिसरातील विकासकामांना जेव्हा सुरुवात होईल तेव्हा हा मुद्दा पुन्हा चर्चेत येणार आहे.
महापालिकेकडून प्राथमिक तयारी
निधी वर्ग झाल्याने महापालिकेने विकासकामांसाठीची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. आचारसंहिता संपताच टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दर्शन मंडप आणि भक्त निवास या दोन वास्तूंना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.