अंबाबाईच्या दर्शनास महागर्दी...
By admin | Published: September 29, 2014 01:05 AM2014-09-29T01:05:35+5:302014-09-29T01:07:22+5:30
कोल्हापूर हाऊसफुल्ल : चौथ्या माळेला रविवारी तीन लाख भाविकांनी घेतले देवीचे दर्शन; जत्रेचे स्वरूप
कोल्हापूर हाऊसफुल्ल : चौथ्या माळेला रविवारी तीन लाख भाविकांनी घेतले देवीचे दर्शन; जत्रेचे स्वरूप
कोल्हापूर : करवीर क्षेत्राची जीवनदायिनी म्हणजे पंचगंगा नदी... आज, रविवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची पंचगंगा उगम रूपात नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला पूजा बांधण्यात आली. रविवार सुटीचा दिवस असल्याने आज दिवसभरात तीन लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यामुळे अवघ्या कोल्हापूरला जत्रेचे स्वरूप आले होते.
आयकर अधिकारी एन. पी. सिंग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील सोनवणे, सामाजिक न्याय विभागाचे संजय पाटील यांनी शासकीय अभिषेक केला. दुपारच्या आरतीनंतर ही पूजा बांधण्यात आली. ब्रह्मदेवांना करवीर नगरी महायज्ञ करायचा होता. त्याच्या पूर्ततेसाठी अवभृत स्नान करणे आवश्यक होते. महान तीर्थ या क्षेत्री असावे, म्हणून वसिष्ठ ऋषींनी सरस्वती, विश्वामित्रांनी भोगावती, कश्यपांनी तुळशी, गालवांनी भद्रा, गर्गांनी कुंभी अशा पाच नद्या बोलावल्या. त्या पंचनद्यांपैकी भोगावती-साक्षात गंगा, सरस्वती, भद्रा म्हणजे विष्णू, शिवा म्हणजे शंकर, कुंभी म्हणजे ब्रह्मा आहेत. या पाचही देवता पंचगंगा नावाने ओळखल्या जातात. हातात वरद कमळ आणि कुंभ धारण करणारी ही गंगा अशेष पापहारिणी म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ शुद्ध दशमीला या पंचगंगेचा प्रकटदिन उत्सव केला जावा, असा करवीर महात्म्यात उल्लेख आहे.
ही पूजा श्रीपूजक सागर मुनीश्वर, रवी माईनकर यांनी बांधली. पूजेची संकल्पना उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर यांची असून, मूर्ती सर्जेराव निगवेकर व प्रशांत इंचनाळकर यांनी साकारल्या आहेत. रात्री अंबाबाईच्या पालखीचे पूजन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते झाले. दिवसभरात विविध संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
दर्शनरांगेचे शेवटचे टोक गुरू महाराज वाड्यापर्यंत
आज, रविवारी सुटी असल्याने सुमारे तीन लाख भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या परिसरात सर्वत्र रांगाच रांगा दिसत होत्या. त्यामुळे पार्किंग व्यवस्थेचाही बोजवारा उडाला.
महिलावर्गाची रांग शेतकरी संघापर्यंत होती, तर पुरुषांच्या रांगेचे शेवटचे टोक गुरू महाराज वाडा येथे होते, तर या रांगांचा मार्ग भवानी मंडप तेथून कमान-जोतिबा रोड-गाडगे महाराज पुतळा वळण आणि शेवट घाटी दरवाजा असा होता. त्यामुळे अंबाबाई परिसरात प्रचंड गर्दी होती.
भवानी मंडप, सबजेल रोड, बिंदू चौक, शिवाजी चौक, गुजरी, महाद्वार रोड, खासबाग आदी परिसराला तर जत्रेचे स्वरूप आले होते. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहने उभी करण्यात आली होती.
पर्यटक, भाविकांच्या वाहनांसाठी बिंदू चौक आणि विद्यापीठ हायस्कूल परिसरात महापालिकेची पार्किंग सुविधा आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने पार्किंगचा बोजवारा उडाला. त्याचबरोबर ठरलेल्या पार्किंग दराऐवजी जादा दराने पार्किंगचे दर आकारले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याशिवाय बालगोपाल तालीम मंडळ, गुरू महाराज वाडा, नूतन मराठीसमोरील बोळ, महालक्ष्मी बँकेसमोरील रस्ता, जोतिबा रोड या परिसरात लोखंडी बॅरेकेटस् लावून भाविकांना पायी जाण्यासाठी केवळ जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात पायी जाणाऱ्या भाविकांचे जथ्थेच जथ्थे दिसत होते. या परिसरात लहान मुलांच्या खेळण्यांचे विक्रीसाठी स्टॉलही लावले आहेत.
भाविकांच्या अलोट गर्दीमुळे एस. एम. लोहिया शाळेचे मैदान, तसेच मेन राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, बिंदू चौक आणि शिवाजी स्टेडियम आदी ठिकाणी चारचाकी गाडी पार्किंगची सोय शहर वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आली होती. वाहतूक शाखेचे पोलीस पर्यटक, भाविकांना पार्किंगबद्दल माहिती देत होते.