Kolhapur: नवरात्रोत्सवनिमित्त अंबाबाईचे सुवर्णालंकार झाले लख्ख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:25 AM2024-09-30T11:25:57+5:302024-09-30T11:26:15+5:30

नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात

Ambabai's golden ornaments were cleaned on the occasion of Sharadiya Navratri festival | Kolhapur: नवरात्रोत्सवनिमित्त अंबाबाईचे सुवर्णालंकार झाले लख्ख

Kolhapur: नवरात्रोत्सवनिमित्त अंबाबाईचे सुवर्णालंकार झाले लख्ख

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. रविवारी दिवसभर गरुड मंडपाच्या जागेत घातलेल्या मांडवात सुवर्ण कारागिरांनी अलंकारांची स्वच्छता केली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने वर्षातून एकदा अंबाबाई पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्यांची स्वच्छता केली जाते. गरुड मंडप येथे यानिमित्ताने कडक सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली होती.

शनिवारी देवीच्या पूजेतील प्रभावळ, पालखी, पायऱ्या, आरती व पूजेचे साहित्य अशा चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली होती. देवीच्या खजिन्याचे मानकरी महेश खांडेकर यांनी रविवारी सकाळी १० च्या सुमारास देवीचे दागिने दिल्यानंतर स्वच्छतेला प्रारंभ झाला. सहा ते सात तास ही स्वच्छता मोहीम सुरू होती. रिठ्याच्या पाण्यात दागिने स्वच्छ धुण्यात आले.

यामध्ये नगरप्रदक्षिणेसाठीचे चांदीचे सिंहासन, चौरंग, चवऱ्या-मोर्चेल तसेच नैवेद्याचे ताट, कटांजन, आरतीचे ताट, घंगाळ, वाट्या, तांबे, तोरण, चोपदार दंड यांचा समावेश असतो. सर्वप्रथम देवीच्या नित्य वापरातील दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. प्रारंभी जडावाचा किरीट, कुंडले, पान, चिंचपेटी, सात पदरी कंठी, कोल्हापुरी साज, श्रीयंत्र, सोन्याची पालखी, चवऱ्या, मोरचेल, चोपदार दंड, मोहनमाळ, मंगळसूत्र, कवड्याची माळ, सोन्याचा चंद्रहार, मोहरांची किंवा पुतळ्याची माळ, ठुशी, म्हाळुंग फळ, नथ, मोरपक्षी या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली.

कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक व कारागीर ही सेवा मोफत देतात. मंदिरातील परंपरागत कारागीर संकेत पोवार, गजानन कवठेकर, अनंत कवठेकर, उमेश लाड, उदय लाड, शैलेश इंगवले, रमेश पोतदार, आकाश लाड, दिनेश सावंत यांनी करवीर निवासिनी देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या देखरेखीखाली या सर्व सोने व चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता केली. स्वच्छतेनंतर सर्व दागिने मंदिराच्या खजिनागृहात ठेवण्यात आले.

नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात

गुरुवारी घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. साडेतीन पीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. तसेच देवीसाठी नित्यालंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी पुतळ्याची माळ, साज, लफ्फा, कमरपट्टा, मुकुट, पाऊल, चंद्रहार, पोहेहार, बोरमाळ, ठुशी, नथ, गदा यासह चांदीचे अलंकार व आभूषणे असे महत्त्वाचे पारंपरिक दागिने देवीला परिधान केले जातात.

मंडप उभारणीस वेग

दर्शनमार्गावरील भाविकांच्या सोयीसाठी शेतकरी संघापर्यंतच्या मंडप उभारणीस आणि स्टेनलेस स्टीलचे बॅरिकेडस उभारणीच्या कामासही वेग आला आहे.

Web Title: Ambabai's golden ornaments were cleaned on the occasion of Sharadiya Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.