अंबाबाईचा आजपासून शारदीय नवरात्रौत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 09:45 PM2017-09-20T21:45:13+5:302017-09-20T21:48:43+5:30
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी साडेआठ वाजता मंदिरात घटस्थापना होईल तर सायंकाळी साडेसहा वाजता मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यंदाच्या नवरात्रौत्सवात श्री दुर्गासप्तशतीवर आधारित श्री अंबाबाईच्या पूजा बांधण्यात येणार आहेत.
आदिशक्ती आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव प्रसिद्ध आहे. या कालावधीत देशभरातून २५ लाखांहून अधिक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवस्थान समितीला अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष मिळाल्याने यंदाचा नवरात्रौत्सव मोठ्या जल्लोषात आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्याचा ‘देवस्थान’चा मानस आहे. पर्यटनवृद्धी आणि भाविकांना सोयी-सुविधा हा उद्देश डोळ््यासमोर ठेवून यंदाच्या नवरात्रौत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भवानी मंडप परिसरातही विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
नवरात्रौत्सवाचा आज, गुरुवारी पहिला दिवस असून देवीला पहाटेचा व सकाळचा अभिषेक झाल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना होईल. त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल. दुपारच्या आरतीनंतर देवीची शैलपुत्री रूपात बैठी पूजा बांधण्यात येणार आहे. दिवसभर अंबाबाई मंदिराच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. रात्री साडेनऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व अंजली पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन होईल.
----------------
श्री अंबाबाईच्या नवरात्रौत्सवातील पूजा
गुरुवार (दि.२१) : श्री शैलपुत्री
शुक्रवार (दि.२२) : दशभूजा महाकाली (खडी पूजा)
शनिवार (दि.२३) : अष्टभूजा महालक्ष्मी (कमळातली)
रविवार (दि.२४) : अष्टभूजा महासरस्वती (खडी पूजा)
सोमवार (दि.२५) : गजारूढ अंबारीतील बैठी पूजा (ललितापंचमी)
मंगळवार (दि.२६) : शृंगेरी शारदांबा (बैठी पूजा)
बुधवार (दि. २७) : श्री भुवनेश्वरी (बैठी पूजा)
गुरुवार (दि २८) : महिषासूरमर्दिनी (अष्टमी)
शुक्रवार (दि. २९) : शस्त्रपूजा (खंडेनवमी)
शनिवार (दि.३०) : रथारूढ पूजा (बैठी पूजा) (विजयादशमी)
------------------
यंदा सुवर्ण पालखीचे आकर्षण
खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने साकारण्यात आलेल्या सुवर्ण पालखीचे यंदाच्या नवरात्रौत्सवात विशेष आकर्षण असणार आहे. आज, घटस्थापनेपासून अष्टमीवगळता नऊ दिवस अंबाबाईची उत्सवमूर्ती या सुवर्णपालखीत विराजमान असेल. त्यामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे देवीची पालखी वेगवेगळ््या आकारात निघणार नाही. मात्र, पालखीला फुलांची सजावट केली जाईल. या पालखीच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. याशिवाय ‘देवस्थान’चे सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत.
----------
त्र्यंबोली यात्रा सोमवारी
यंदा ललितापंचमी दोन दिवस आहे. मात्र, ज्या दिवशी सहा घटिकांपेक्षा अधिक काळ ललिता पंचमी असते, त्या दिवशी त्र्यंबोली यात्रा साजरी केली जाते. यंदा सोमवारी (दि. २५) त्र्यंबोली यात्रा होणार आहे. या दिवशी सकाळी ७ ते १० या वेळेत अंबाबाईचे धार्मिक विधी केले जातील. १० वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघेल. दुपारी १२ वाजता कोहळा छेदन विधी होणार आहे.
-------------------
अष्टमीचा जागर
यंदा अष्टमी गुरुवारी (दि.२८) आहे. या दिवशी रात्री साडेनऊ वाजता अंबाबाई फुलांनी सजविलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणेला निघेल. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिरात भेटीवेळी मानाचे विडे देण्याचा कार्यक्रम होईल. नगरप्रदक्षिणा संपल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत देवीचा जागर होईल. शुक्रवारी खंडेनवमीनिमित्त शस्त्र पूजन होईल. शनिवारी सायंकाळी पाच वाजता अंबाबाईची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी सीमोल्लंघनाला जाईल. रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक होईल.
------------------
पिण्याचे पाणी, अन्नछत्र, आरोग्य केंद्र
देवस्थान समितीतर्फे दर्शनरांगांसाठी वाढीव मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरासह बा' परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मंदिर परिसरातील उद्यान व शेतकरी संघाच्या इमारतीत प्राथमिक उपचार केंद्र असणार आहेत तर विद्यापीठ गेटसमोर अत्याधुनिक यंत्रणेसह अॅम्ब्युलन्स सज्ज असेल. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे रोज दहा हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
----------------
फोटो नं २००९२०१७-कोल-अंबाबाई०१
ओळ :
दुर्गाशक्तीची महती सांगणाºया शारदीय नवरात्रौत्सवाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पंखपूजा बांधण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
-----------
०२,०३
देवीची ज्योत नेण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपºयांतून तरुण मंडळांचे जथ्थे मंदिरात आले होते.
------------
इंदूमती
-----------