नवरात्रौत्सवाची सहावी माळ, अंबाबाईचे काशीविश्वेश्वराला दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 07:23 PM2020-10-22T19:23:24+5:302020-10-22T19:24:56+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur, navratri2020, kolhapurnews शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची काशीविश्वेश्वराला दर्शन देत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची काशीविश्वेश्वराला दर्शन देत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली.
ही पूजा आहे भगवान शंकर काशी सोडून करवीरात निवासाला आले त्या प्रसंगाची. विश्वाच्या निर्मितीनंतर भगवान विष्णूंनी दोन क्षेत्रांची निर्मिती केली, एक उत्तरेला काशी, दुसरं दक्षिणेला करवीर. उत्तरेची काशी ही मुक्तिदायक ज्ञानपीठ, तिचं स्वामित्व भगवान विश्वेश्वराचं, तर दक्षिणेचं करवीर म्हणजे मुक्तीबरोबरच भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देणारं महामातृक म्हणजे शक्तीपीठ.
जेव्हा विष्णूंनी या दोन क्षेत्रांची तुलना केली, तेव्हा मुक्तीबरोबर भुक्ती देणारं हे क्षेत्र केवळ एका जवाच्या वजनानं श्रेष्ठ ठरलं म्हणून ही जवा आगळी काशी हा महिमा जाणून भगवान विश्वेश्वर आपल्या सर्व परिवारासह करवीरात आले. त्यांनी जगदंबेचं दर्शन घेतले आणि त्याप्रसंगी देवीने त्यांना सांगितले की, आपण माझ्या उजव्या बाजूला राहून सर्व भक्तांना तारक मंत्र द्या. त्याप्रमाणे आजही भगवान विश्वेश्वर माता अन्नपूर्णा धुंडीराज गणपती आणि काशी कुंडातील गंगेसह घाटी दरवाजाजवळ असलेल्या मंदिरात राहून भक्तांना मुक्ती देतात. ही या पूजेमागील आख्यायिका आहे. ही पूजा माधव मुनीश्वर आणि मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.
तिरुपतीहून शालू अर्पण
दरवर्षीप्रमाणे यंदाही तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने अंबाबाईला शालू अर्पण करण्यात आला. या शालूची किंमत एक लाख चार हजार इतकी आहे. देवस्थानचे ट्रस्टी भास्कर रेड्डी, लक्ष्मी रेड्डी, प्रशांती रेड्डी, स्वर्णलता रेड्डी, सुषमा जेट्टी, अपर्णा धर्मा रेड्डी, जया रमेश रेड्डी यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.